मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे तब्बल 845 कोटींचे नुकसान

औरंगाबाद – मराठवाड्यात गुलाब चक्रीवादळामुळे झालेल्या तुफानी पावसाने सर्वत्र हाहाकार उडवून दिला आहे. यापावसामुळ सर्व जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसाने दहा लाखापेक्षा अधिक हेक्टरवरील पीकांचे नुकसान केले आहे याशिवाय जीवित आणि वित्त हानी मोठ्या प्रमाणात झाली आहे. या नुकसानीतुन मराठवाड्याला सावरण्यासाठी सुमारे 845 कोटी 79 लाख रूपयांच्या मदतीची गरज असल्याचा प्राथमिक अहवाल तयार करण्यात आला आहे.

गुलाब चक्रीवादळाच्या प्रभावामुळे मराठवाड्याच्या सर्वच जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसाने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पिके पाण्याखाली गेली असून शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास यंदा निसर्गाने हिरावुन घेतल. सप्टेबरमध्ये मराठवाड्यात अनेक भागात अतिवृष्टी झाली होती. तर गेल्या दोन दिवसात गुलाब चक्रीवादळाच्या प्रभावामुळे मुसळधार पावसाने काढणीला आलेले सोयाबीन, मुग, उडीद, भुईमूग आदी पिके होत्याची नव्हते केले. कपाशी, मका, उस, मोसंबी, बाजरी आडवी झाली. शेतांमध्ये गुडघाभर पाणी साचले असून मुळ्या कुजत आहेत , पिके पिवळी पडत आहेत. नद्या, ओढे दुथडी भरून वाहत असून अनेक ठिकाणी पाझर तलाव फुटल्याने पीकासह जमीन खरवडून गेली. खरीप हंगाम हातचा गेल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. विभागीय आयुक्त कार्यालयाने सोमवार आणि मंगळवारी झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसानीची आकडेवारी आणि त्यासाठी अपेक्षित निधी याबाबत प्राथमिक अहवाल तयार केला आहे. दोन दिवसात आठही जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले. त्यासोबत जीवितहानी मोठ्या प्रमाणात झाली. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान आणि अनेक घरांची पडझड झाली.

मराठवाड्याला नुकसान भरपाईसाठी अपेक्षित निधी किती लागेल, याचा प्राथमिक अहवाल तयार करण्यात आला आहे. गुलाब चक्रीवादळाने आणलेल्या दोन दिवसातील मुसळधार पावसाने विभागातील 12 लाख 3 हजार 958 शेतकऱ्यांच्या 10 लाख 56 हजार 848 हेक्टर क्षेत्रावरील पीकांचे नुकसान झाले आहे. यासाठी तब्बल 710 कोटी 15 लाख 63 हजार 400 रूपयांच्या अर्थिक मदतीची गरज भासणार असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. 104 गावांचा संपर्क तुटलेला आहे तर नऊ गावे पुराच्या वेढयात आहेत त्याठिकाणी प्रशासनाकडून मदत केली जात आहे. ७७७ लोक पुरात अडकले होते, त्यातील काहींना प्रशासनाच्यावतीने तर काहींना स्थानिक नागरिकांच्या वतीने सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. या पावसाने सार्वजनिक मालमत्तेचेही मोठे नुकसान केले आहे. जिल्हा परिषदेची एक शाळा पडली आहे. 17 तलाव फुटले आहेत. 293 ठिकाणी महावितरणची नुकसान झाले आहे. दोन दिवसात पावसाने 845 कोटी 79 लाख 61 हजार 712 रूपयांचे नुकसान केल्याचा प्राथमिक अंदाज अहवाल तयार करण्यात आला आहे.