हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जे लोक उन्हाळाच्या सुट्टीसाठी गावी जातात त्यांच्यासाठी एसटी महामंडळाने (MSRTC) मोठी खुशखबर आणली आहे. सध्या मुलांच्या परीक्षा सुरु असल्या तरी, उन्हाळी सुट्ट्यांमध्ये गावी जाण्याचे प्लॅनिंग विद्यार्थ्यांपासून ते इतर प्रवाशांपर्यंत सर्वांचं लक्ष वेधून घेतलेले असते. पण काही गाड्या त्यांच्याकडून अतिरिक्त पैसे उकळतात, त्यामुळे हा प्रवास जास्त खर्चिक होतो. यामुळे प्रवासातील आनंद नाहीसा होतो, याच पार्श्वभूमीवर राज्यातील परिवहन मंडळाने यंदा विशेष तयारी केली आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांच्या काळात प्रवाशांचा प्रवास थंडगार व्हावा यासाठी 872 वातानुकूलित (Air-conditioned) शिवशाही बसेस सेवेत आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे असंख्य प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
विविध भागात या विशेष बसेस धावणार –
महाराष्ट्राच्या विविध भागात या विशेष बसेस धावणार आहेत. मुंबई सेंट्रल व परळ आवारातून अतिरिक्त गाड्या सोडण्यात येणार आहेत. पुणे, नाशिक, रत्नागिरी, कोल्हापूर, संभाजीनगर, जळगाव, बीड, नागपूर, अहिल्यानगर यांसारख्या ठिकाणांपर्यंत शिवशाही बससेवा सुरू राहणार आहे. अनेक गावांमध्ये एसटी बस जात नाही , अन यामुळे स्थानिक प्रवासी मोठ्या प्रमाणावर वेगळ्या गाडयांना पसंती देतात. याचाच फायदा खासगी ट्रॅव्हल्सवाले घेतात , अन त्यांच्याकडून जास्त पैसे घेतात .
2640 नवीन ‘लाल परी’ गाड्या दाखल होणार –
या निर्णयासोबतच महामंडळाने येत्या काही काळात 2640 नवीन ‘लाल परी’ गाड्या दाखल होणार असल्याची माहिती दिली आहे. दरमहा 300 गाड्यांच्या टप्प्याटप्प्याने सेवा सुरू होणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे नागरिकांना उन्हाळाच्या काळात शांत अन थंडगार प्रवास करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे. तसेच नागरिकांना प्रवासादरम्यान होणार त्रास कमी होणार आहे.