स्वारगेट प्रकरणात 893 पानी आरोपपत्र दाखल; समोर आली धक्कादायक माहिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । स्वारगेट एसटी बस स्थानकातील शिवशाही बसमध्ये घडलेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणाचा तपास झपाट्याने करत पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने 52 दिवसांत 893 पानी आरोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे. आरोपी दत्तात्रय गाडे (वय 37, रा. गुनाट, शिरूर) याच्याविरुद्ध हे आरोपपत्र प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. ए. मकानदार यांच्या न्यायालयात गुरुवारी दाखल करण्यात आले. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी तपास गुन्हे शाखेकडे वर्ग केला होता.

घटनास्थळी सापडलेले पुरावे –

शिवशाही बसमध्ये पीडित तरुणी व आरोपीचे केस, तसेच आरोपीच्या शर्टाचे बटन आढळले. रासायनिक प्रयोगशाळेच्या तपासणीत हे पुरावे आरोपीशी संबंधित असल्याचे स्पष्ट झाले.

साक्षीदारांचे जबाब –

एकूण 82 साक्षीदारांची चौकशी करण्यात आली असून, 5 साक्षीदारांचे जबाब न्यायालयात नोंदवण्यात आले. यात प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचा समावेश आहे, ज्यांनी आरोपीला पीडितेसोबत बोलताना पाहिल्याचा दावा केला.

सीसीटीव्ही व ओळख परेड –

स्वारगेट बसस्थानकातील सीसीटीव्ही फूटेजमध्ये आरोपी दिसून आला आहे. तसेच ओळख परेडमध्ये पीडित तरुणीने आरोपीला ओळखले आहे.

गुगल सर्च हिस्टरी –

सायबर तज्ज्ञांच्या साहाय्याने तपासलेल्या आरोपीच्या गुगल सर्च इतिहासात अश्लील व्हिडीओ पाहण्याची सवय दिसून आली. याच आधारे गुगल सर्च पंचनामा तयार करण्यात आला.

लैंगिक क्षमता अहवाल –

ससून रुग्णालयाच्या तीन डॉक्टरांनी आरोपी लैंगिकदृष्ट्या सक्षम असल्याचा अहवाल दिला आहे.

तुलनात्मक ध्वनी तीव्रता पडताळणी –

शिवशाही बसमधील आवाज बाहेर येतो का, याची तपासणी ध्वनीतज्ज्ञांमार्फत करण्यात आली. आवाज बाहेर ऐकू येत नसल्याचं स्पष्ट झालं.

डीएनए अहवाल –

आरोपी गाडे याचा डीएनए घटनास्थळी सापडलेल्या पुराव्यांशी जुळला असल्याचे सिद्ध झाले आहे.

घटनेची पार्श्ववभूमी –

दिनांक 25 फेब्रुवारी रोजी पहाटे पावणेसहा ते पावणेसातच्या सुमारास स्वारगेट बस स्थानकातील शिवशाही बसमध्ये पीडित तरुणीवर आरोपी दत्ता गाडे याने दोन वेळा अत्याचार केला. ही घटना घडल्यानंतर आरोपी गाडे गुनाट गावात लपून बसला होता. ग्रामस्थांच्या मदतीने ड्रोन, श्वान पथक आणि इतर तंत्रांचा वापर करून पोलिसांनी त्याला अटक केली. त्यानंतर त्याला 12 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती आणि सध्या तो येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे.