भिंत कोसळून 9 जणांचा मृत्यू; शिवलिंग बनवताना काळाचा घाला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वायनाड आणि हिमाचल प्रदेशातील भूस्सखलनानंतर आता मध्य प्रदेशातून एक हृदयद्रावक घटना घडली आहे. शिवलिंग बनवत असताना अचानक भिंत कोसळून ९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ४ मुले जखमी झाली असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. सर्व मृत व्यक्तीचे वय 9 ते 19 दरम्यान असल्याने अगदी लहान वयातच त्यांच्यावर काळाने घाला घातला असं दुर्दैवाने म्हणावं लागेल. मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यात हि दुर्दैवी घटना घडली आहे. मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी मृत मुलांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ४ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशातील हरदौल मंदिरात शिवलिंग बांधणे आणि भागवत कथेचे आयोजन सुरू आहे. सकाळपासूनच याठिकाणी शिवलिंगांची निर्मिती केली जात आहे. आजही नेहमीप्रमाणे शिवलिंग बनवायला सुरुवात झाली होती. मात्र याच दरम्यान, मंदिर परिसराला लागून असलेली पन्नास वर्षे जुनी मातीची भिंत कोसळली. ही भिंत थेट शिवलिंग बनवणाऱ्या मुलांवर पडल्याने यामध्ये ९ जणांचा मृत्यू झाला. अचानक घडलेल्या या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली. यानंतर भिंतीचा ढिगारा हटवून त्याखाली दबलेल्या मुलांना बाहेर काढण्यात आले. खरं तर हि पडलेली भिंत पन्नास वर्षे जुनी असल्याची माहिती आहे. त्यातच सागर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु असल्याने भिंत जागीच कोसळली.

दरम्यान, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी या या घटनेवर शोक व्यक्त करत मृत मुलांच्या नातेवाईकांना प्रत्येकी चार लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली.याबाबत त्यांनी ट्विट करत म्हंटल जखमी मुलांवर योग्य उपचार करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत. मृत बालकांच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. या दुर्घटनेत जखमी झालेल्या इतर मुलांची प्रकृती लवकरात लवकर बरी व्हावी अशी माझी इच्छा आहे. ज्या कुटुंबांनी निष्पाप मुले गमावली आहेत त्यांच्याबद्दल माझ्या संवेदना आहेत. मृत मुलांच्या कुटुंबीयांना सरकारकडून प्रत्येकी 4 लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.