सातारा | सातारा-मेढा मार्गावर असलेल्या नुने येथे दुचाकी व चारचाकीच्या अपघातात 9 वर्षाच्या चिमुकल्यांसह बापाचा जागीच मृत्यू झाला. तर चारचाकी गाडीतील एक युवक गंभीर जखमी झाला आहे. अपघातात मृत बापलेक हे कण्हेर येथील आहेत.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा- मेढा मार्गावर सुनिल रामचंद्र वाघमळे (वय- 42), व लहान मुलगा संस्कार (वय-9) हे दुचाकीवरून मंगळवारी रात्री प्रवास करत होते. कण्हेरकडे जाताना नुने येथील नंदीचा उतार याठिकाणी समोरून येणाऱ्या चारचाकी आणि दुचाकीचा जोरदार अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील बापलेक दोघेही जागीच ठार झाले. तर चारचाकीमधील एक युवक गंभीर जखमी झाला आहे.
अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती कळताच घटनास्थळी कण्हेरसह परिसरातील लोकांनी पाहण्यासाठी गर्दी केली होती. या घटनेची माहिती सातारा तालुका पोलिसांना मिळताच घटनास्थळी पोलिस दाखल झाले होते. जखमींना उपचारार्थ रूग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच पोलिसांनी अपघातस्थळाचा पंचनामा केला आहे. अपघाताचा पुढील अधिक तपास पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलिस करत आहेत.