मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावर प्रवास करणाऱ्या लाखो वाहनचालकांसाठी आनंदाची बातमी आहे. खोपोली – कुसगाव दरम्यानच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे तब्बल ९३% काम पूर्ण झाले असून, उर्वरित काम ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी ऑगस्टचा मुहूर्त जाहीर केला आहे. या नव्या मार्गिकेच्या उपयोगामुळे मुंबई – पुणे प्रवास तब्बल २० ते २५ मिनिटांनी कमी होईल, तसेच वाहतूक कोंडी आणि अपघातांच्या संख्येतही मोठी घट होण्याची अपेक्षा आहे.
गती, सुरक्षितता आणि अभियांत्रिकीचा अद्भुत संगम
१९.८० किमी लांबीच्या या मार्गिकेच्या कामाला २०१९ मध्ये सुरुवात झाली. अत्याधुनिक अभियांत्रिकी तंत्रज्ञानाचा वापर करून हे काम हाती घेण्यात आले आहे. प्रकल्पातील सर्वात महत्त्वाचे दोन बोगदे – एक १.७५ किमी आणि दुसरा तब्बल ८.९२ किमी लांब – पूर्ण झाले आहेत. विशेष म्हणजे ८.९२ किमीचा बोगदा हा आशियातील सर्वांत रुंद असून, तो डोंगराखाली आणि लोणावळा तलावाच्या ५००-६०० फूट खाली बांधण्यात आला आहे.
वाहतूक सुरक्षेचा विचार करून, प्रत्येक ३०० मीटरवर आपत्कालीन मार्ग उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच, केबल स्टेड पुलाचे अंतिम टप्प्यातील काम चार ते पाच महिन्यांत पूर्ण होणार असून, हा प्रकल्प ऑगस्टमध्ये वाहतुकीसाठी खुला करण्याचा संकल्प एमएसआरडीसीने केला आहे.
ऑगस्टपासून प्रवास आणखी सुकर
ऑगस्टपासून मुंबई – पुणे प्रवास अधिक वेगवान आणि सुरक्षित होणार आहे.
महामार्गाचा ८-लेन विस्तार आणि नवीन मार्गिकेमुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.
नवीन तंत्रज्ञानावर आधारित बोगद्यांमुळे प्रवाशांना उत्तम अनुभव मिळणार आहे.