औरंगाबाद प्रतिनिधी | अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हा मराठी साहित्य विश्वातील महत्वाचा उत्सव असतो. मराठी साहित्य संमेलनाचे या वर्षीचे यजमान पद उस्मानाबाद शहराला देण्यात आले असून मागील पाच वर्षापासून उस्मानाबाद यासाठी मागणी करत होते. अखेर जानेवारी २०२० मध्ये होणाऱ्या ९३ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे यजमान पद उस्मानाबादला देण्याचे अरुण ढेरे यांचा समावेश असणाऱ्या १९ सदस्यीय समितीने निश्चित केले आहे.
संमेलनाची तारीख अद्याप निश्चित केली गेली नसली तरी येत्या जानेवारी महिन्यात म्हणजे नूतन वर्षाच्या पहिल्या महिन्यात हे संमेलन उस्मानाबाद येथे पार पडणार आहे. त्याच प्रमाणे अध्यक्ष निवडीची प्रक्रिया लवकरच पार पडणार असल्याची माहिती देखील साहित्य परिषदेच्या वतीने देण्यात आली.
सासवड येथे पार पडलेल्या साहित्य संमेलना पासून उस्मानाबाद येथील साहित्य संस्थेने संमेलन घेण्यासंदर्भात मागणी केली होती. मात्र मागील पाच वर्षात साहित्य परिषद त्यांच्या मागणीची पूर्तता करू शकले नाही. या वर्षी साहित्य परिषदेने उस्मानाबादची मागणी मान्य केल्याने साहित्य विश्वातून याबद्दल आनंद व्यक्त केला जात आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजा भवानीआणि संत गोरोबाकाकांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या भूमीत हे साहित्य संमेलन पार पडणार आहे. यावर्षी बुलढाणा, लातूर, नाशिक आणि उस्मानाबाद अशा चार ठिकाणावरून साहित्य संमेलनाच्या यजमान पदाचे प्रस्ताव आले होते. यात उस्मानाबादने बाजी मारली आहे.