95 वर्षीय आजीने केली कोरोनावर मात ; 15 दिवसाचे उपचार घेऊन परतल्या घरी.
औरंगाबाद : लासुर स्टेशन येथून जवळच असलेल्या नागरे बाभूळगाव येथील गीताबन आयसीयु कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या 95 वर्षीय भागीरथी बाई मोरे या आजीबाईंनी तब्बल 15 दिवसांचे औषधोपचार घेऊन कोरोनावर यशस्वीरीत्या मात करत नुकत्याच आपल्या कुटुंबासमवेत घरी परतल्या आहेत.
पतीच्या मृत्यूनंतर 20 वर्षापासून आजीबाई मुलगा रामहरी व सून मुक्ताबाईसह शेती करतात. वयाची नव्वदी ओलांडलेल्या भागीरथी बाई आजही शेतातील नित्य नियमाने कामे करतात.
त्यांचा कोरोना अहवाल दि 1 मे रोजी पॉझिटिव्ह आला होता. त्यांच्याबरोबर त्यांच्या कुटुंबातील अन्य दोन जणांचा अहवालही पॉझिटिव्ह आल्याने त्यांना गंगापूर तालुक्यातील सिद्दीनाथ वडगाव येथील कोरोना उपचार केंद्रात विलगिकरण कक्षात दाखल करण्यात आले होते. परंतु त्या ठिकाणी ऑक्सिजनची व्यवस्था नसल्याने डॉक्टरानी त्यांना तेथून दुसरीकडे हलवण्यास सांगितले. नातू बळी मोरे यांनी कुठला ही विलंब न करता गीताबन आयसीयु कोविड हॉस्पिटल मध्ये त्यांना दाखल केले. भागीरथी बाई मोरे यांच्यावर येथील तज्ञ डॉक्टराच्या पथकाच्या निगराणी मध्ये तब्बल 15 दिवस उपचार मिळाले आणि आज त्या कोरोनाला हरवून आपल्या नातवंड व मुलासह घरी परतल्या आहेत.