औरंगाबाद : ओटीपी क्रमांकाची देवाण घेवाण किंवा कॉल न करता क्रेडिट कार्ड वरून दोन ऑनलाइन पेमेंट झाल्याची घटना समोर आली आहे. हे ऑनलाईन पेमेंट एका अँप वरून झाली असल्याची माहिती समोर आली आहे. या ॲपद्वारे 93 हजार 525 रुपये परस्पर गायब झाले आहे. अनुप श्रोत्रिय (50) यांच्यासोबत हा प्रकार घडला असून या प्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माछर इंडस्ट्रीतील मुख्य वित्तीय अधिकारी असलेल्या श्रोत्रिय यांना 11 मे रोजी दुपारी मोबाईलवर सलग पाच वेळा बँकेचे मेसेज आले होते. त्यात त्यांच्या क्रेडिट कार्ड वरून रिचार्ज आणि मोबिक्विक या दोन ॲप वर पैसे गायब झाल्याचा उल्लेख करण्यात आला होता. आणि 8 जून रोजी त्यांना पुन्हा क्रेडिट कार्ड चे बिल आले.
फक्त पाच मिनिटांमध्ये सायबर गुन्हेगारांनी पहिल्या टप्प्यात 8 हजार 296 रुपये, दुसऱ्या टप्प्यात 47 हजार 892 रुपये, तिसऱ्या टप्प्यात 8 हजार 296 रुपये, चौथ्या टप्प्यात 8 हजार 296 तर शेवटी 8 हजार 296 रुपये काढून घेतले आहे. या सर्व प्रकारादरम्यान किंवा त्या आधी मला कुठलाही कॉल आला नाही तसेच मी कोणालाही ओटीपी शेअर केला नाही. असा दावा श्रोत्रिय यांनी तक्रारीत केला आहे. या घटनेनंतर त्यांनी तात्काळ बँकेशी संपर्क साधून तक्रार दाखल केली. तरीही 8 जून रोजी त्यांना क्रेडिट कार्डचे बिल आले. त्यांनी मुकुंदवाडी पोलिसांकडे तक्रार दिली याचा तपास पोलिस निरीक्षक सुधाकर बावकर करत आहेत.
प्रत्यक्षात ओटीपी शेअर केला नसला तरीही, मोबाईल मधील ॲपला आपण नकळत अनेक परमिशन देत असतो. इंटरनेटवरील अनेक अँप ची पहिली अट असते. त्यामुळे थर्ड पार्टी च्या माध्यमातून सायबर गुन्हेगार परस्पर ओटीपी च्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यात प्रवेश करतात असं सायबर पोलिस ठाण्याचे निरीक्षक गीता बागवडे -आरवणे यांनी सांगितलं.