औरंगाबाद |23 जूनला महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या संगणकीय प्रणालीवर दहावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनाचा निकाल भरण्यास सुरुवात झाली होती. यापैकी 2 जुलैपर्यंतच्या मुदतीत जिल्ह्यातील 99.87 टक्के विद्यार्थ्यांचे निकाल शाळांनी ऑनलाईन भरले आहे. जिल्ह्यातील 97 विद्यार्थ्यांचे निकाल भरणे अजुन बाकी असून, 601 विद्यार्थ्यांचे निकाल शाळांनी भरले आहे. परंतु, त्यांची अजून ऑनलाईन निश्चिती केली नाही. त्याचबरोबर 62 हजार 741 विद्यार्थ्यांचे निकाल भरल्याची माहिती शिक्षणाधिकारी डाॅ. बी. बी. चव्हाण यांनी दिली.
विभागीय शिक्षण मंडळाच्या वतीने येणाऱ्या पाच जिल्ह्यांमध्ये 2560 शाळांंमधून दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेसाठी 1 लाख 76 हजार 193 नियमित विद्यार्थ्यांनी, आणि 7 हजार 418 पुनर्परीक्षार्थींनी अर्ज दाखल केले होते. त्याच विद्यार्थ्यांचे निकाल बोर्डाकडून देण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील 62 हजार 731 नियमित, तर 22 हजार 80 पुन:परीक्षार्थी असे एकूण 65 हजार 11 विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत. त्यापैकी 62 हजार 741 विद्यार्थ्यांचे निकाल भरून निश्चिती करण्यात आली. 97 विद्यार्थ्यांचे निकाल भरणे अपूर्ण आहे, 601 विद्यार्थ्यांचे निकाल शाळांनी भरले, पण, त्यांची ऑनलाईन निश्चिती केली नसल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. ज्यांचे निकाल अपूर्ण आणि निश्चित केले नाहीत, त्या विद्यार्थ्यांसाठी मुदतवाढ मिळणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तसेच निकालाचे अभिलेखे जमा करण्याचे काम 6 जुलैपर्यंत केले जाणार आहे.
हाती आलेल्या माहितीनूसार, विभागातील 99 टक्केपेक्षा अधिक निकाल ऑनलाईन भरून झाले आहेत. फार थोड्या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन येणे बाकी आहे. दहावी निकालाची ऑनलाईन निश्चिती व अपूर्ण राहिलेल्या कामांसाठी मुदतवाढीबाबत अद्याप राज्य मंडळाकडून कोणत्याही सूचना मिळाली नाही.