पाटण तालुका हादरला : 15 वर्षीय युवतीवर अत्याचार

पाटण प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

पाटण तालुक्यात एका पंधरा वर्षीय युवतीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी एका अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कोयनानगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पोक्सो अंतर्गत गुन्हा घडला असून कोयननगर पोलीस स्टेशनमध्ये सदर गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, कोयना परिसरातील एका गावातील पंधरा वर्षीय युवतीवरती अल्पवयीनने अत्याचार केला. युवतीवर अत्याचार झाल्याची घटना आज उघडकीस आली.  सदर घटना कुटुंबीयांच्या लक्षात आल्यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी कोयना पोलीस स्टेशनला धाव घेतली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांकडून तपासाची सूत्रे फिरवण्यात आली. त्यानंतर पोलीसांनी अल्पवयीन संशयिताला ताब्यात घेतले. तसेच पोक्सो अंतर्गत आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी हा अल्पवयीन असल्याने त्याची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.

संबंधित पीडिता ही नऊ महिन्यांची गरोदर असून या घटनेमुळे पाटण तालुक्यात खळबळ उडाली आहे. सातारा जिल्ह्यात एकाच महिन्यातील तिसरी अन पाटण तालुक्यातील दुसरी घटना आहे. या घटनेनंतर कोयना भाग हादरून गेला असून पाटण तालुक्यातील वाढत असलेल्या गुन्हेगारीबाबत पुन्हा एकदा लोकांच्या चर्चेला उधान आले. या घटनेचा तपास कोयनानगर पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक गायकवाड हे करत आहेत.