कराड प्रतिनिधी । संतोष गुरव
शाळेतील मुलांमध्ये वाचन संस्कृती वाढावी, लहानपणापासूनच त्यांना विविध पुस्तकांची आवड निर्माण व्हावी यासाठी कराडमध्ये पुस्तकांची बाग ही संकल्पना सुरु करण्यात आली आहे. कराड शहरातील स्व. यशवंतराव चव्हाण सभागृह तथा टाऊनहॉल येथील बागेत ही सुंदर अशी पुस्तकांची बाग साकारण्यात आली आहे. कराड पालिकेच्यावतीने आयोजित या पुस्तकांच्या बागेच्या संकल्पनेच्या माध्यमातून उन्हाळा सुट्टीत मुलांना छान छान गोष्टींसह विविध प्रकारची पुस्तके अगदी मोफत वाचनासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
कराड शहरात स्थानिक लोकप्रतिनिधींकडून शहरातील लहान मुळापासून ते वयोवृद्ध नागरिकांसाठी अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात. असाच एक आगळावेळा उपक्रम पालिकेचे माजी विरोधीपक्षनेते सौरभ पाटील यांच्या संकल्पनेतून कराड शहरातील टाऊनहॉल येथे राबविण्यात येत आहे तो म्हणजे पुस्तकांची बाग होय. या बागेचे वैशिष्ठय म्हणजे या ठिकाणी उंच अशा शोभिवंत वृक्षांवर पुस्तके लटकविण्यात आलेली आहे. या ठिकाणी अनेक प्रकारची पुस्तके हि लटकवून त्यातुन सुन्दर अशी बाग साकारण्यात आलेली आहे.
या बागेत आल्यावर कोणालाही येथील पुस्तके वाचल्याशिवाय राहवणार नाही. या ठिकाणी पालिकेच्या वाचनालयात लहान मुलांना एकदा सभासद नोंदणी केल्यानंतर त्यांना ओळखपत्र दिले जाते. त्या ओळखपत्राच्या साह्याने त्यांना मोफत पुस्तके वाचनासाठी दिली जातात. ती पुस्तके घेऊन वृक्षांच्या सावलीखाली बसून ती मुले पुस्तकांतील गोष्टी वाचू शकतात.
स्वच्छ कराडात मुलांसाठी साकारलीय 'पुस्तकांची बाग' pic.twitter.com/AbXoMmcsLd
— santosh gurav (@santosh29590931) May 3, 2023
लहान मुलांमध्ये पुस्तकांच्या वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून हा उपक्रम गेल्या तीन वर्षांपासून आम्ही राबवित आहोत. इयत्ता पाचवी ते सातवीमधील मुलांना मागील वर्षी वाचनालयाची मोफत मेम्बरशीप देखील आम्ही दिलेली आहे, अशी माहिती कराड पालिकेचे माजी विरोधी पक्षनेते सौरभ पाटील यांनी दिली.