कोल्हापूर | पुणे येथील महाराष्ट्र महसूल न्यायाधीकरण खंडपीठ येथे दाखल दाव्यांचा निकाल आपल्या बाजूने करून देतो, असे सांगून पुण्यातील शेतकऱ्याकडे तब्बल एक कोटीच्या लाचेची मागणी करण्यात आली होती. कोल्हापूर पोलीस मुख्यालयातील कॉन्स्टेबल जॉन वसंत तिवडे (वय- 40, रा. कोरोची, ता. हातकणंगले ) याच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. लाचेसाठी एक कोटीची पोलिसांकडून मागणी झाल्याने कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
पुणे येथील महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरण खंडपीठात हवेली तालुक्यातील देहूगाव येथील एका शेतकऱ्यांच्या जमिनीसंदर्भात तीन दावे दाखल झाले आहेत. त्याची सुनावणीही सुरू आहे. या प्रकरणाशी संबधित फेब्रुवारी 2022 रोजी तक्रारदार शेतकऱ्याला समक्ष भेटायला कोल्हापूरला अनोळखी व्यक्तीने बोलावले होते. त्यानुसार दिनांक 22 मार्च 2022 रोजी शेतकरी कोल्हापूर येथे आला. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात येऊन संपर्क साधला असता. अनोळखी व्यक्ती पोलीस कर्मचारी असल्याचे समजले. त्यानंतर त्याच दिवशी तक्रारदार व्यक्ती व पोलीस यांची मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील एका हॉटेलमध्ये बैठक झाली. तेथे जॉन तिवडे याने स्वतःची ओळख करून देत आपण पोलीस असल्याचे आणि महसूल खात्यातील बहुतांश वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आपले चांगले संबंध असल्याचे सांगितले.
पुणे येथील महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरण खंडपीठ येथे प्रलंबित खटल्याचा निकाल आपल्या बाजूने लावून देऊ शकतो, असे सांगून तुमच्या विरुद्ध असलेल्या पार्टीने आपणाला एक कोटी रुपयांची ऑफर दिली आहे. आपल्या बाजूने निकाल लावण्यासाठी आपण किती देणार बोला, असा सवाल करून त्याने एक कोटी रुपयांची मागणी केली होती. तेव्हा तक्रारदार व्यक्तीने घरच्या मंडळींशी चर्चा करून आपणाला सांगतो, असे सांगून तक्रार व्यक्ती तेथून निघून गेली त्यांनी सरळ लाचलुचपत प्रतिबंध पथकाचे पोलीस उपाधीक्षक आदिनाथ बुधवंत यांच्याशी संपर्क करून पोलीस कॉन्स्टेबल जॉन तिवडे याच्याविरुद्ध फिर्याद दाखल केली.
तक्रारदार व्यक्तीने आठवड्यापूर्वी पोलीस उपाधीक्षक बुधवले यांच्याशी पुन्हा संपर्क साधला लाचलुचपत प्रतिबंध पथकाने एक कोटीच्या करण्यात आलेल्या लाचेच्या मागणीची पडताळणी केली असता, जॉन तिवडे याने पैशाची मागणी केल्याचे चौकशी निष्पन्न झाल्यानंतर शाहूपुरी पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.