औरंगाबाद – नगर महामार्गावर भरधाव कार हाॅटेलमध्ये घुसली

औरंगाबाद – औरंगाबादकडुन नगरकडे जाणारी भरधाव कार अचानक हाॅटेलमध्ये घुसली. त्यात दोन जण गंभीर, तर एकाच्या पायाला दुखापत झाली आहे. यात दोन दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे. ही घटना औरंगाबाद- नगर महामार्गावरील जिकठाण फाट्यानजीक (ता.गंगापूर) येथे आज दुपारी दोनच्या सुमारास घडली.

या विषयी अधिक माहिती अशी की, मुख्य महामार्गावरील इसारवाडी फाटा ते शिवराई दरम्यानच्या अंतरावर अपघाताच्या घटना रोज सुरूच आहे. नगरहून औरंगाबादकडे कार (एमएच 20 ईई 5885) ही भरधाव वेगाने जात होती. जिकठाण फाट्याजवळ येताच कार चालकाचा ताबा सुटला. आणि रोडवर उभ्या असलेल्या दुचाकी (एमएच 20 एफझेड 7544) आणि अजून एक अशा दोन दुचाकीचा चुराडा करीत सदरची कार शेजारच्या हाॅटेलमध्ये घुसली. या घटनेत दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. तर एकाच्या पायाला किरकोळ मार लागला. शेजारीच क्रिकेटचा सामना सुरू असल्याने त्या ठिकाणी बघ्याची मोठी गर्दी होती. मात्र सुदैवाने या ठिकाणी मोठा अनर्थ टळला. नाना निकम, अरुणा निकम, गंभीर तर ऋषिकेश निकम किरकोळ जखमी झाले.

पुढील उपचारासाठी त्या दोघांनाही नागरिकांनी खासगी दवाखान्यात दाखल केले आहे. यात जिकठाण येथील उद्धव खोमणे यांच्या पायाला मार लागला आहे. दोन्ही दुचाक्याची नासधुस करीत ज्या ठिकाणी कार थाबंली त्या जवळच जिकठाण येथील कैलास खोमणे, शिवाजी खोमणे, राजु खोमणे हे ग्रामस्थ चहाचा आस्वाद घेत होते. सुदैवाने हे तिघेही बालंबाल वाचले. अशाच प्रकारे लिंबेजळगाव येथे मागील महिन्यात हाॅटेलात कार घुसून खुर्चीवरील नागरिकाचा मृत्यु झाल्याची घटना सर्वश्रुतच आहे. पुन्हा अशीच घटना ऐज घडल्याने रोडवरील व्यावसायिकात खळबळ उडाली आहे.