हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कराड शहरात पालिकेकडून परवानागी न घेता जाहिरात फलक लावणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. या प्रकरणी पालिकेकडून स्ज सहा जणांविरोधात दंडात्मक कारवाईसोबत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित जाहिरातदराने शहरात विविध ठिकाणी फ्लेक्स बोर्ड, फलक, लहान बोर्ड विनापरवाना लावले होते.
याबाबत अधिक माहिती अशी की, कराड शहरात विना परवाना जाहिरात फलक, फ्लेक्स, लहान बोर्ड लावण्यात आल्याचे निदर्शनास आले होते. मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी आरोग्य विभागाचे अभियंता आर. डी. भालदार, आरोग्य निरीक्षक मिलिंद शिंदे, वरिष्ठ मुकादम मारुती काटरे यांना याबाबत पाहणी करून कारवाई करण्याबाबत सूचना केली होती. त्यानुसार पाहणी करून खात्री केल्यानंतर संबंधित फलक, बोर्ड जप्त करुन ते लावणाऱ्या सहा जणांवर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेल्या मध्ये सुभित भूषण यादव (सुभित अकॅडमी), देसाई हॉस्पिटल, शितल कुमार (एक देश एक कोर्स), पूजा विकास भुजंगे (आर्य अॅबॅकस), राहुल टाक (स्वराज गोल्ड), राजेंद्र भोसले (गावरान चिकन) यांचा समावेश आहे.
कारवाई करण्यात आलेल्या संबंधितांनी शहरातील विविध भागात झाडावर, खांबावर विनापरवाना 175 हून अधिक बोर्ड फलक लावले होते. आरोग्य निरिक्षक मिलिंद शिंदे यांनी शहरातील विविध ठिकाणी विना परवाना लावलेल्या फ्लेक्स, फलक व बोर्ड बाबत खात्री करून वरील सहा जणांच्या विरोधात महाराष्ट्र मालमत्तेच्या विदुषणास प्रतिबंध करणे बाबतचा अधिनियम 1995 चे कलम 3 नुसार कायदेशीर तक्रार कराड शहर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
यावेळी मुकादम सुरेश शिंदे, अभिजीत खवळे यांनी आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने शहरात विविध ठिकाणी विना परवाना लावलेले फ्लेक्स, लहान फलक, बोर्ड काढण्यास सुरूवात केली आहे. आत्तापर्यंत दीडशेहून अधिक बोर्ड, फलक काढून जप्त केले आहेत.