जयवंत शुगरची बदनामी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड | खोटी कागदपत्रे बनवून जयवंत शुगर कारखान्याची बदनामी होईल, अशी पोस्ट सोशल मिडीयावर व्हायरल केल्याप्रकरणी एकावर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत कारखान्याच्या प्रशासन विभागातील क्लार्क रणजीत कदम यांनी फिर्याद दिली आहे. ओमकार अरुण साळुंखे (रा. रेठरे खुर्द, ता. कराड) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धावरवाडी येथील जयवंत शुगर कारखान्याच्या प्रशासन विभागात रणजीत कदम हे क्लार्क म्हणून नोकरीस आहेत. 26 जुन 2021 रोजी रणजीत कदम हे सोशल मिडीया पाहत असताना, त्यांना ओमकार साळुंखे यांनी टाकलेली एक पोस्ट दिसून आली. त्या पोस्टमध्ये जयवंत शुगर कारखान्याचे बनावट लेटरहेड, बनावट बिल, बनावट ईन्व्हाईस तसेच त्यावर खोटा जीएसटी क्रमांक होता. तसेच त्या पोस्टवरुन खोटी माहिती प्रसारीत करण्यात आली होती. त्यामुळे रणजीत कदम यांनी याबाबतची माहिती कारखाना प्रशासनाला दिली. कारखान्याने कदम यांनाच याबाबत तक्रार अर्ज देण्यास नियुक्त केले.

त्यानुसार 31 जुलै 2021 रोजी कदम यांनी याबाबत कराड शहर पोलिसात तक्रारी अर्ज दिला. पोलिसांनी ओमकार साळुंखे याच्याकडे चौकशी केली असता, त्याने सोशल मिडीयावर आलेली पोस्ट आपल्या अकाऊंटवरुन पुढे सोशल मिडीयावर टाकल्याचे सांगीतले. कारखान्याची बदनामी तसेच शेतकरी आणि सभासदांची त्या पोस्टद्वारे बदनामी केल्यामुळे रणजीत कदम यांच्या फिर्यादीवरुन शुक्रवारी ओमकार साळुंखे याच्याविरोधात कराड शहर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Leave a Comment