वैजापूर : शहरातील रहिवासी भागातील एका घरात साठवून ठेवलेला सव्वा लाख रुपयांचा गुटखा स्थानिक पोलिसांच्या पथकाने सोमवारी छापा टाकून जप्त केला. याप्रकरणी अन्न व सुरक्षा विभागाने दिलेल्या तक्रारीवरून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इम्रान निजाम शेख व जावेद शेख शब्बीर शेख ( दोघे रा. वैजापूर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे असून एकास ताब्यात घेण्यात आले.
याबाबत हाती आलेल्या माहितनुसार, शहराच्या इंगळे गल्लीतील एका घरातून दुकानदार व पान टपरीधारकांच्या गुटखा विक्री केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार उपनिरीक्षक विजय जाधव, पोलीस नाईक जालिंदर तमनर, विशाल पैठणकर, प्रवीण अभंग, राम राठोड, महिला कर्मचारी मंगल ठाकरे यांच्या पथकाने इंगळे गल्लीतील एका घरावर छापा टाकला. यावेळी पोलिसांना त्या ठिकाणी शासनाने प्रतिबंधित केलेल्या वेगवेगळ्या कंपनीची तंबाखू व पानमसालाचे पोते आढळून आले. या घरातून पोलिसांनी 1 लाख 15 हजार 720 रुपयांचा गुटखा जप्त केला. हा गुटखा इम्रान शेख व जावेद शेख या दोघांचा असल्याने पोलिसानी याची माहिती अन्न व औषधी विभागाला कळवली.
त्यानुसार अन्न सुरक्षा अधिकारी सुलक्षणा जाधवर यांनी वैजापूर गाठले. जाधवर यांनी पोलिसांनी पकडलेल्या मालाची तपासणी केल्यावर तो प्रतिबंधित गुटखा असल्याचे आढळून आले. या प्रकरणी सुलक्षना जाधवर यांच्या तक्रारीवरून वैजापूर पोलिसांनी इम्रान शेख व जावेद शेख या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.