सातारा | म्हसवड येथील माणगंगा नदी पात्रातून सुरु असलेल्या चोरटी वाळू वाहतूक करणाऱ्यांवर म्हसवड पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत एक पिकअप व पाऊण ब्रास वाळू असा सुमारे 2 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी सहा जणांविरोधात म्हसवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, म्हसवड येथील माणगंगा नदी पात्रातून चोरटी वाळू वाहतूक सरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे सपोनि राजकुमार भुजबळ यांनी म्हसवड शहरातील मानेवस्ती शेजारील माणगंगा नदी पात्रातील बंधारा येथे पाहणी केली. दरम्यान, पिकअप (क्र. एम एच- 09 बीसी-8313) पोलिसांना दिसून आली. यावेळी पोलिसांची चाहूल लागल्याने संशयितांनी अंधाराचा फायदा घेत पळ काढला.
याप्रकरणी वाहनचालक योगेश लिंगे, प्रतीक ओतारी व अनोळखी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सपोनि राजकुमार भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अंमलदार सुरेश काकडे, पीएसआय विशाल भंडारे व सुरज काकडे यांनी केली.