शहरात ‘या’ ठिकाणी होणार चार्जिंग स्टेशन

औरंगाबाद – दिवसागणिक पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढतच आहेत. त्यामुळे अनेक नागरिक आता ई-वाहनांना अधिक प्राधान्य देत आहेत. त्यामुळे या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेतर्फे शहरात सात ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहेत, अशी माहिती प्रशासक अस्तिक कुमार पांडेय यांनी दिली आहे. शहरातील मध्यवर्ती जकात नाका येथील मनपाच्या पेट्रोल पंपावर चार्जिंगची यंत्रणा उभारण्यात आली असून, लवकरच तेथे या सेवेचे लोकार्पण करण्यात येणार आहे.

शहरात पाच ठिकाणी महानगरपालिका पेट्रोल पंप उभारणार आहे. हर्सूल जकात नाका परिसर, चिकलठाणा येथे मनपा कचरिया प्रक्रिया केंद्राच्या बाजूला तर जळगाव रोडवर, नक्षत्र वाडी येथे मनपाच्या जागेवर पंप राहील. या पंपावर पेट्रोल डिझेलची विक्री करण्यात येणार आहे. सध्या मध्यवर्ती जकात नाका येथे सुरू केलेला प्रगती पेट्रोल पंप चांगला सुरू आहे. शहरात आणखी चार ठिकाणी पंप सुरू करण्याची प्रक्रिया जोरात सुरू आहे. या सेवेस सोबतच मनपा प्रत्येक पंपावर चार्जिंग स्टेशनही उभारणार आहे. याशिवाय मनपा मुख्यालय स्मार्ट सिटी कार्यालयातही ही सुविधा राहणार आहे. महापालिकेच्या जकात नाका येथील पंपावर 24 के.व्ही. आणि 7 केव्हीची दोन यंत्रे स्वतंत्रपणे चार्जिंगसाठी आणण्यात आली आहेत. लवकरच ही सेवा सुरू होईल. पंधराव्या वित्त आयोगातून मिळालेल्या निधीतून मनपा प्रशासन स्वतः काही वाहने खरेदी करणार आहे.

याठिकाणी असतील चार्जिंग स्टेशन –
मध्यवर्ती जकात नाका पेट्रोल पंप
मनपा मुख्यालय
स्मार्ट सिटी कार्यालय
हर्सूल जकात नाका
चिकलठाणा कचार प्रकल्पाजवळ
नक्षत्रवाडी पंप हाऊसजवळ
जळगाव रोड