व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

अज्ञात डंपरच्या धडकेत पिता पुत्र ठार तर महिला गंभीर जखमी

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

आष्टा – इस्लामपूर रस्त्यावर गोटखिंडी फाटा येथे अज्ञात डंपरने दिलेल्या धडकेत मोटारसायकलवरील पिता पुत्र जागीच ठार झाले तर मृताची पत्नी गंभीर जखमी आहे. सकाळी साडे आठच्या सुमारास हा अपघात झाला. अंकुश शिवाजी साळुंखे (वय 40), मुलगा आदित्य अंकुश साळुंखे (वय 13) हे जागीच ठार झाले तर मृत अंकुश साळुंखेची पत्नी सोनाली अंकुश साळुंखे (सर्व रा. राजारामनगर हजारमाची, ता. कराड) या गंभीर जखमी असून त्यांना सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अंकुश साळुंखे हे आपल्या हॅरी होंडा सी डी डीलक्स मोटारसायकल क्र. एम. एच. 50 आर 1676 वरून पत्नी व मुलासमवेत इस्लामपुरकडे जात असता गोटखिंडी फाटा नजीक वळणावर सांगलीकडे जाणाऱ्या अज्ञात डंपरने त्यांच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली. या धडकेत अंकुश साळुंखे व त्यांचा मुलगा आदित्य हे जागीच ठार झाले. तर पत्नी सोनाली या गंभीर जखमी झाल्या. घटनास्थळीचे चित्र अत्यंत विदारक होते. गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला होता. या अपघाताची माहिती मिळताच आष्टा पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी बघ्यांनी गर्दी केली होती.