कराडच्या काॅटेज हाॅस्पीटलला अखेर पूर्णवेळ अर्थोपडीक सर्जनची नेमणूक

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

येथील स्व. वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात डॉ. सुमित सतीश शिंदे यांची अर्थोपेडीक सर्जन म्हणून नेमणूक झाली आहे. रिक्त असलेल्या पदावर बऱ्याच कालावधीनंतर उपजिल्हा रुग्णालयाला पूर्णवेळ अर्थोपडीक सर्जन मिळाल्याने रुग्णांची चांगली सोय होणार आहे.

वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात आतापर्यंत पूर्णवेळ देणारे अर्थाेपडीक सर्जन कोणी नव्हते. त्यामुळे रूणांना पुरेशी सेवा मिळत नव्हती. गंभीर अपघात किंवा सांध्याचे आजार व अवघड शस्त्रक्रियेसाठी रुग्णांना सातारा किंवा खासगी रुग्णालयात पाठवावे लागत होते. अनेक वर्षे या रुग्णालयाला पूर्ण वेळ अर्थाेपडीक सर्जनची गरज होती. डॉ. सुमित शिंदे यांच्या नेमणुकीने ही गरज पूर्ण झाली असून रुग्णांना शासकीय खर्चात चांगली सेवा मिळणार आहे.

या निवडीबद्दल डॉ. सुमित शिंदे यांचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, खा. श्रीनिवास पाटील, जयंतकाका पाटील, बाळासाहेब कुलकर्णी तसेच लायन्स क्बल कराडचे अध्यक्ष खंडू इंगळे व पदाधिकारी तसेच कराड शहरातील सिनियर डॉक्टर्स यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.

डॉ. सुमित शिंदे यांचे पदव्युत्तर शिक्षण हे अत्यंत प्रसिध्द संचिती इन्स्टिट्यूट पुणे तसेच मुंबई महानगर पालिकेतील व्ही. एन. देसाई व भाभा हॉस्पिटल येथे त्यांनी प्रशिक्षण घेतले. हैद्राबाद येथील सनशाईन हॉस्पिटल जेथे फक्त गुडघ्याच्या कृत्रिम सांधे रोपनाच्या शस्त्रक्रिया होतात तेथे त्यांनी उच्च शिक्षण घेतले आहे. डॉ. सुमित शिंदे यांच्या नेमणुकीमुळे कराड व परिसरातील गरीब रुग्णांना नक्कीच फायदा होणार आहे.

You might also like