हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शेख हसीना यांनी बांग्लादेशच्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिल्यानंतरही बांग्लादेश मधील हिंसाचार थांबायचं नाव घेईना. खास करून हिंदू नागरिक आंदोलकांचे लक्ष्य बनत आहेत. बांग्लादेश मधील हिंदू यामुळे धोक्यात आले असून अनेक ठिकाणी हिंदूंची घरे आणि मंदिरे जाळण्याचा प्रयत्न झाला आहे. यामुळे बांग्लादेश मधील हिंदू धर्माच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असतानाच आता स्वत:ला इस्लामिक विद्वान म्हणवून घेणाऱ्या अबू नजम फर्नांडो बिन अल-इस्कंदर यांनी बांगलादेशातून हिंदूंना पूर्णपणे नेस्तनाबूत करण्याचे आवाहन केले आहे. इस्लामिक न्यायशास्त्राचा हवाला देत त्यांनी म्हटले आहे की, हिंदूंकडे दोनच पर्याय आहेत, त्यातील पहिला पर्याय म्हणजे मृत्यूला कवटाळणे आणि दुसरा पर्याय म्हणजे इस्लाम धर्म स्वीकारणे..
स्वत:चे पीएचडी विद्यार्थी म्हणून वर्णन करणाऱ्या अल-इस्कंदरने ट्विटमध्ये म्हटले आहे की, “मला हे जाणून समाधान वाटत आहे की अहल-ए-सुन्ना इस्लामिक न्यायशास्त्राच्या चारपैकी तीन विचारधारांचे म्हणणे आहे की हिंदूंकडे फक्त दोनच पर्याय असावेत.” एक म्हणजे तलवारीला सामोरे जावा आणि दुसरा म्हणजे इस्लामचा स्वीकार करा. त्यांनी पुढे म्हंटल, ‘हिंदूंनी आभार मानले पाहिजे की ते सध्या हनफीचा सामना करत आहेत, मलिकी, शफी किंवा हनबली नाही.’ सर्व सुन्नी मुस्लिमांमधील मुस्लिम कायद्याच्या या चार प्रमुख विचारधारा आहेत.
त्यांनी हनबली इस्लामिक कायद्याचा हवाला देत म्हटलं, सौदी अरेबिया आणि कतारमधील प्रबळ सुन्नी विचारधारा, ज्यामध्ये असे म्हटले आहे की मुस्लिमांपेक्षा वेगळे ओळखण्यासाठी हिंदूंनी डोक्याच्या पुढील बाजूचे केस मुंडन करावे. मुस्लिमांपेक्षा कमी दर्जाचे असल्यामुळे गैर-मुस्लिमांना कसे अपमानास्पद वागणूक मिळावी, हे दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. ज्या हिंदूंनी मुस्लिम देशांमध्ये राहून त्यांच्यापेक्षा खाली राहणे स्वीकारले त्यांच्याबद्दल मला कोणतीही अडचण नाही असं म्हणत अबू नजम फर्नांडो बिन अल-इस्कंदर यांनी स्वतःला उदारमतवादी चेहरा करण्याचा प्रयत्नही केला आहे. बांगलादेशातील अल्पसंख्याकांवर होणारे हल्ले हे हिंदू प्रचार असल्याचे त्यांनी वर्णन केले आणि बांगलादेश हिंदू प्रभाव आणि हस्तक्षेपापासून मुक्त होईल अशी आशा व्यक्त केली.