पुणे । पिंपरी-चिंचवडसह पुण्यात आमदारांचा आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा पी. ए. बोलत असल्याचे सांगून अनेकांकडून पैसे उकळल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी तीन जणांना पोलिसांनी अटक केली असल्याचे वृत्त दैनिक ‘लोकसत्ता’ने दिलं आहे. दैनिक ‘लोकसत्ता’ने पोलिसांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, मुख्य सूत्रधार विशाल अरुण शेंडगे यांच्यासह साथीदार सौरभ संतोष अस्टूळ, किरण धन्यकुमार शिंदे यांना निगडी पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, आरोपी हे चोरीच्या सिमकार्ड वरून संबंधित व्यक्तींना फोन करीत असल्याचे समोर आले आहे. आरोपींनी चार ते पाच व्यापाऱ्यांना आणि मोठ्या रुग्णालयांना अशा प्रकारे आपल्या धमकावले होते. ज्यांची फसवणूक झाली किंवा ज्यांना खंडणीसाठी फोन आले होते त्यांनी पुढे येऊन निगडी पोलिसांत तक्रार नोंदवावी असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील एका नामांकित रुग्णालयातील डॉक्टरला फोनद्वारे ‘मी चंद्रकांत पाटील यांच्या ऑफिसमधून पी.ए सावंत बोलतोय कोरोना महामारीमुळे गरिबांची परिस्थती अत्यंत बिकट झाली आहे. त्यांच्या मदतीसाठी ताबडतोब २५ लाख रुपयांची रक्कम पर्वतीच्या कार्यकर्त्यांकडे पाठवून द्या अन्यथा जीवे मारले जाईल अशी धमकी देण्यात आली होती. त्यानंतर घटनेची शहानिशा केली असता पाटील यांच्या पी.एचा तो फोन नसल्याचे समोर आले. तेव्हा संबंधित रुग्णालयाने निगडी पोलिसांत तक्रार नोंदवली होती. प्रकरण गंभीर असल्याने याचा छडा लावण्यासाठी निगडी पोलिसांचे एक पथक तयार करण्यात आले.
घटनेचा तपास करीत असताना पुण्यातील एका नारळ विक्रेत्यापर्यंत तपास येऊन पोहोचला. ज्या नंबरवरून फोन येत होता तो नारळ विक्रेता वापरत होता असं पोलीस तपासात निष्पन्न झालं. तेव्हा, काही दिवसांपूर्वी नारळपाणी विक्रेत्यांकडे दोन आरोपी नारळपाणी घेण्यास आले होते. पैकी, एकाने अर्जेंट कॉल करायचा म्हणून विक्रेत्याकडून फोन घेतला आणि दोन मिनिटांनी परत केला. मात्र, त्यावर फोन येत नसल्याने रिचार्ज संपला असेल म्हणून दुसऱ्या दिवशी नारळ विक्रेत्याने रिचार्ज करण्यास प्रयत्न केला असता फोनमध्ये सिमकार्ड नसल्याचे समोर आले. सिमकार्ड चोरीला गेल्याचे समजताच. संबंधित कंपनीच्या कार्यलयात जाऊन सिमकार्ड बंद करण्यास सांगितले. मात्र, त्यासाठी त्यांनी आधारकार्डची मागणी केली. परंतु, नारळ विक्रेत्याकडे ते नव्हते, कारण १० वर्षांपूर्वी मित्राच्या नावावर त्याने सिम घेतले होते. त्यामुळे सिमकार्ड सुरूच होते.
निगडी पोलिसांनी असा लावला प्रकरणाचा छडा
तांत्रिक तपास करून त्याच नंबरवरून पुण्यातील आणि पिंपरी-चिंचवड शहरातील चार ते पाच व्यवसायिकांना आरोपींनी फोन केले होते. पुण्यातील एका व्यापाऱ्याला विश्वासात घेऊन पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर कोकाटे, पोलीस कर्मचारी किशोर पंढेर, सतीश ढोले भुपेंद्र चौधरी, आरोपीला पैसे घेऊन येत असल्याचे सांगितले. तेव्हा पहिल्यांदा पुण्यातील कौसर बाग येथे आरोपींनी बोलावले त्यानंतर अलंकार चौकात बोलविले. पोलीसच व्यापारी बनून पैसे देण्यास गेल्याने काही तासांनी आरोपी येताच त्यांना निगडी पोलिसांनी पकडले. दरम्यान, आरोपी समोरच्या व्यक्तीला बोलावल्यानंतर पोलीस तर नाहीत ना याची शहानिशा करण्यासाठी अगोदर येत होते, अशी माहिती निगडी पोलिसांनी दिली आहे.
पुण्यातील कोंढवा, कोथरूड, समर्थ नगर, पौड पोलीस ठाण्यात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार बाबर, निम्हण, यांचे नाव घेऊन पैसे मागितल्याचे खंडणी आणि फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. या टोळीचा पर्दाफाश करण्याचे काम वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक महेंद्र अहिर यांच्या पथकाने केले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”