तब्बल 10 ते 12 ठिकाणी चोरीचा प्रयत्न करत ‘या’ शहरातील उपनगरात चोरटयांच्या टोळीचा धुमाकूळ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

इस्लामपूर शहरातील तलाठी कॉलनी, उरूण परिसर व जिजाऊनगर परिसरात सोमवार व मंगळवारी मध्यरात्री अज्ञात चोरटयांच्या टोळीने धुडगुस घातला. सोमवारी चोरटयांच्या हाताला फारसा मुद्देमाल लागला नाही परंतु मंगळवारी रात्री जिजाऊनगर येथील घरफोडी करून चोरटयांनी एलईडी, रोख रक्कम, चांदीची मुर्ती असा एकूण 37 हजार 700 रूपयांचा मुद्देमाल लंपास केला. इस्लामपूर शहर सीसीटिव्हीच्या कक्षेत आले असलेतरी चोरटयांनी मात्र दोन रात्री विविध भागात धाडसी चोरीचा प्रयत्न केल्याने इस्लामपूर पोलिसांसमोर चोरटयांचा बंदोबस्त करण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.

सोमवारी रात्री चोरटयांच्या टोळीने तलाठी कॉलनी व उरूण परिसरातील दहाहून अधिक घरे फोडण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांच्या हाताला फारसे काही लागले नाही. उरूण परिसरातील मध्यवस्तीत असणार्‍या उदय चौकातील डॉ.विश्वास पाटील यांच्या बंगल्याला चोरटयांनी लक्ष केले. परंतु पाटील कुटुंबिय जागे झाल्याने चोरटयांनी घटनास्थळावरून पलायन केले. पलायन करतानाही काही ठिकाणी घरफोडीचा प्रयत्न चोरटयांच्या टोळीने केला. जिजाऊनगर परिसरातील घरांना चोरटयांनी लक्ष केले.

बुधवारी सकाळी नवीन घरामध्ये देवपूजा करण्यासाठी अरविंद काळे कुटुंबियांसह गेले असता सकाळी 9.30 च्या सुमारास घराच्या दरवाजाचा कोयंडा तुटून कुलूप खाली पडलेले दिसून आले. घरातील साहित्य अस्ताव्यस्तपणे पडलेले होते. होमथिअटर, देवीची चांदीची मुर्ती व रोख रक्कम 25 हजार रूपये अज्ञातांनी चोरून नेल्याचे निदर्शनास आले. अरविंद काळे यांच्या घराशेजारील किसन रामचंद्र जाधव यांच्या घराचा दरवाज्याचाही कडी कोयंडा उचकटलेल्या अवस्थेत दिसून आला. त्यांच्या घरातील एलईडी टिव्ही चोरटयांनी गायब केला होता. इस्लामपूर शहरातील उपनगरांबरोबरच मध्यवस्तीत धाडसी चोरीचा प्रयत्न चोरटयांच्या टोळीने दोन दिवसात विविध भागामध्ये केलेला दिसून येत आहे. त्यामुळे ऐन थंडीच्या मोसमात चोरटयांनी चोरीचा धडाका सुरू केला आहे. पोलिस प्रशासनाने रात्रगस्त वाढवून चोरटयांचा पायबंद करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

Leave a Comment