खुलताबाद – प्रसिद्ध भद्रा मारुती मंदिर परिसरासह खुलताबादेतून दुचाकी चोरी करणाऱ्या पाच जणांच्या टोळीस चाळीसगाव पोलीसांनी पकडून खुलताबाद पोलीसांच्या ताब्यात दिले आहे. त्यांच्याकडून चोरीच्या पाच दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या असून पुढील तपास सुरु आहे. खुलताबाद शहर व परिसरातून गेल्या काही महिन्यापासून दुचाकी चोरीच्या घटनेत वाढ झाली आहे. पोलीसांनी तपास करूनही चोर हाती लागत नव्हते.
दरम्यान , ३० ऑगस्ट रोजी चाळीसगाव शहर पोलिसांनी दोन विनाक्रमांकाच्या दुचाकीवरून जाणाऱ्या चार जणांना संशयावरून ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता खुलताबाद व भद्रा मारूती मंदीर परिसरातून दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. तसेच तेथून चोरी केलेल्या दुचाकी विक्रीसाठी चाळीसगावला आणल्याचे सांगितले. शिपाई यानंतर खुलताबाद पोलिसांनी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनमधून आरोपींना ताब्यात घेतले. त्यामध्ये मच्छींद्र गणराज (रा.रांजणगांव खुरी ता.पैठण), सौरभ साहेबराव इंदापुरे (रा.रांजणगांव खुरी ता.पैठण), शुभम दामांदर नेव्हाल (वाळुज ता, गंगापुर), महेंद्र शंकर जाधव (रा.गणेशनगर, चाळीसगांव जि.जळगाव) आणि अजय भानुदास गणराज (रा.रांजणगांव खुरी ता.पैठण) अशी आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीच्या पाच दुचाकी ताब्यात घेण्यात आल्या आहेत. याप्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक सीताराम मेहत्रे, फौजदार जनार्दन मुरमे, बीट अंमलदार रतन वारे, शेख जाकीर, यतीन कुलकर्णी, सिद्धार्थ सदावर्ते, किशोर महेर, प्रमोद गरड, बालाजी डाके करीत आहेत.