हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की (Vladimir Zelensky) यांच्यात व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या बैठकीत वाद झाला असल्याची माहिती समोर आली आहे. रशिया (Russia) आणि युक्रेन (Ukrain) यांच्यात सुरू असलेल्या युद्धावर तोडगा काढण्यासाठी ही बैठक महत्त्वाची मानली जात होती. मात्र, चर्चेदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये तीव्र वाद झाला, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर खळबळ उडाली आहे.
व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या बैठकीत ट्रम्प यांनी झेलेन्स्की यांना थेट सवाल करत म्हटले की, “तुम्ही युद्ध हरत आहात आणि तुमच्या हातात आता कोणतेही प्रभावी पर्याय उरलेले नाहीत. जर युक्रेनने रशियाशी तडजोड केली नाही, तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील.” ट्रम्प यांच्या या वक्तव्यामुळे युक्रेनच्या भविष्यासंदर्भात मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
महत्वाचे म्हणजे, हा वाद पुढे पत्रकार परिषदेत देखील सुरू राहिला. ट्रम्प यांनी झेलेन्स्की यांच्याशी संवाद साधताना म्हटले की, “अमेरिकेने तुम्हाला पाठिंबा दिला आहे, हे विसरू नका. तुम्ही आमचे आभार मानायला हवे. अशा परिस्थितीत एकत्र काम करणे कठीण आहे.” यावर झेलेन्स्की यांनी प्रतिक्रिया देताना म्हणले, “युक्रेन केवळ स्वतःसाठी नव्हे, तर जागतिक स्थैर्यासाठीही संघर्ष करत आहे.”
पुढे ट्रम्प यांनी झेलेन्स्की यांना थेट इशारा देत म्हटले की, “तुम्ही लाखो लोकांच्या जीवाशी खेळत आहात. जर तुम्ही योग्य वेळी तडजोड केली नाही, तर हे संपूर्ण जगासाठी धोकादायक ठरेल. तुम्ही तिसऱ्या महायुद्धाला निमंत्रण देत आहात. त्याचबरोबर, युक्रेनच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त करताना ट्रम्प यांनी सांगितले की, “या संघर्षामुळे जागतिक शांततेला धोका निर्माण झाला आहे. तुम्ही जर योग्य वेळी योग्य निर्णय घेतला नाही, तर संपूर्ण जग त्याचे परिणाम भोगेल.”
दरम्यान, ट्रम्प यांच्या या वक्तव्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. अमेरिकेच्या पूर्वीच्या धोरणांपेक्षा ट्रम्प यांची भूमिका अधिक तडजोडीची असल्याचे स्पष्ट होत आहे. मात्र, झेलेन्स्की यांनी अद्यापही संघर्ष सुरू ठेवण्याची भूमिका कायम ठेवली आहे. अशा परिस्थितीत, युक्रेन-रशिया युद्ध लवकर संपुष्टात येईल की नव्या संकटांना सामोरे जावे लागेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.




