औरंगाबाद : शहरात कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत असताना येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जाधववाडी बाजारपेठेमध्ये आज नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे दिसून आले. फळभाज्या विक्रेत्यांसह नागरिकांनीं बाजारपेठेत तुफान गर्दी केली होती. या वेळी सोशल डिस्टंसिंगच्या आदेशाचा पुरता फज्जा उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
एकीकडे शहर व जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ होत असताना प्रशासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत. मात्र नेहमीप्रमाणेच आज नागरिकांनी बाजारपेठेत मोठया प्रमाणात गर्दी केली होती. शहरात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद आहेत. ‘लॉकडाऊन’दरम्यान नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून दूध, फळे व भाजीपाला यांसह किराणा दुकाने ठरावित वेळेत सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे, परंतु सुरुवातीपासूनच जाधववाडीसह विविध बाजारात तोबा गर्दी होत आहे. त्यामुळे या गर्दीला आवरणार कोण असा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला आहे.
जाधववाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात गेल्या काही दिवसापासून शेतीनियमित मालाची आवक मंदावली आहे, केवळ ठोक विक्रीला परवानगी असतानाही बाजारात गर्दी दिसून आली. रोजगार उपलब्ध नसल्याने अनेकांनी फळे व भाजीपालाचा व्यवसाय सध्या सुरू केल्याचे दिसून येते. त्यामुळे सध्या किरकोळ विक्रेत्यांची संख्या वाढल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, पहाटेपासूनच फळे व भाजीपाला मार्केटमध्ये गर्दी झाल्याने या गर्दीला आवरणार कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याचप्रमाणे कोरोना बाधितांची संख्या हजारोच्या घरात गेली असताना नागरिकांना नियमांचा विसर पडला आहे.