Video : बिबट्या घरात घुसला अन् अख्या गाव पळाला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी|सकलेन मुलाणी
सातारा जिल्ह्यातील कोयना विभागातील हेळवाक येथे घरात बिबट्या घुसला होता. कुत्र्याची शिकार करण्यासाठी मागे पळालेला बिबट्या थेट घरातच घुसल्याने घरातील लोकांची पाचावर धारण बसली. घरमालकाने चतुरायीने बाहेर पडत घराला कडी लावल्याने बिबट्याला जेरबंद करण्यात यश आले आहे.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, पाटण तालुक्यातील कोयना विभागातील हेळवाक येथे रात्री उशिरा बिबट्या एका घरात घुसल्याचा प्रकार घडला. गुरुवारी रात्री हेळवाक येथील सुधीर कारंडे यांच्या घरात घुसलेल्या बिबट्याला वन्यजीव विभागाने यशस्वीरित्या पिंजऱ्यात पकडले. कुत्र्याचा पाठलाग करणारा बिबट्या घरात घुसला. त्यानंतर घरमालकाने कुत्रा आणि बिबट्या दोघांना घरात बंद केले होते. रात्री उशिरापर्यंत वन्यजीव विभागाचे वनक्षेत्रपाल संदीप जोपळे, संदीप कुंभार, वन्यजीव विभागाचे वनपाल, वनरक्षक तसेच रेस्क्यू ऑपरेशन पथक बिबट्याला पकडण्यासाठी कार्यरत होते. सदर बिबट्या हा लहान वर्षभराचा असून त्याच्या एका डोळ्यास बहुतेक मोतीबिंदू असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. तर मागील उजव्या पायाने लंगडत आहे. बिबट्या घरात घुसल्याची माहिती मिळताच अख्या गाव सुधीर कारंडे यांच्या घराकडे पळाला.

या बिबट्याला विभागीय वनाधिकारी विशाल माळी यांच्या सूचनेनुसार पुढील उपचारासाठी हलवण्यात येणार आहे. या बिबट्याला सुखरूप पकडण्यासाठी विभागीय वनाधिकारी विशाल माळी, सहाय्यक वनसंरक्षक तुषार ढमढेरे, वनक्षेत्रपाल संदीप जोपळे, संदीप कुंभार, वन्यजीव विभागाचे सर्व कर्मचारी तसेच रेस्क्यू पथक पोलीस कर्मचारी व स्थानिकांनी मोठे सहकार्य केले.