कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी
पाटण तालुक्यातील गुंजाळी गावात बंगल्याच्या सुरक्षेसाठी मालकाने 5 परदेशी कुत्री पाळली आहेत. परंतु याच कुत्र्याच्या आता सुरक्षेची काळजी घेण्याची परिस्थिती मालकावर उद्भवली आहे. कारण या कुत्र्यांवर बिबट्याने हल्ला केला असून 2 कुत्र्याचा फडशा पाडला आहे. कुत्र्यावरील हल्ला प्रकरण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, गुंजाळी येथे आनंद मुळीक यांचा बंगला आहे. या बंगल्याच्या सुरक्षेसाठी मालकाने 5 कुत्रे पाळले आहेत. सदरचा बंगला डोंगराळ भागात असल्याने चोरांपासून संरक्षणासाठी कुत्र्यांचा पर्याय ठेवण्यात आला आहे. अशा अनेक बंगल्यांमध्ये परदेशी प्रजातीचे कुत्रे दिसतात. आता बिबट्याने या कुत्र्यांना आपले लक्ष्य बनवले आहे.
बिबट्याच्या हल्ल्यात 2 परदेशी कुत्री ठार. सीसीटीव्हीत कैद pic.twitter.com/aFuJVXtyTd
— Vishal Vaman Patil (@VishalVamanPat1) December 27, 2022
बिबट्याने दोन दिवसापूर्वी एकाच बंगल्यातील 2 कुत्र्यांची शिकार केल्याने बंगल्याच्या मालकासह वनविभाग आणि ग्रामस्थही धास्तावले आहेत. या सोबतच आता दिवसाही बिबट्याचे दर्शन होत असल्याने शेतकऱ्यांसह पशुपालकही अडचणीत आले आहेत. बिबट्याने बंगल्यात घुसून हल्ला केल्याने व किंमती कुत्र्याची शिकार केल्याने लोकांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.