मुंबई, पुणे आणि नागपूरसारख्या महानगरांमध्ये मेट्रोमुळे प्रवास अधिक वेगवान, सोयीस्कर आणि सुरक्षित झाला आहे. आता याच यशस्वीतेचा अनुभव घेण्याची संधी बदलापूरवासीयांना मिळणार आहे. राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी आणि भविष्यामध्ये दृष्टी ठेवून आखलेल्या प्रकल्पांतर्गत कांजूरमार्ग ते बदलापूर या दरम्यान तब्बल ३८ किलोमीटर लांबीचा मेट्रो मार्ग उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी १८,००० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) कडून त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे.
हा मेट्रो प्रकल्प दोन भागांमध्ये विभागला गेला आहे. पहिला टप्पा कांजूरमार्ग ते घनसोली असा भूमिगत (Underground) असणार असून, दुसरा टप्पा घनसोली ते बदलापूर या दरम्यान एलिव्हेटेड (Elevated) स्वरूपात बांधला जाणार आहे. प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करण्यात आला असून, तो मिलान मेट्रो या आंतरराष्ट्रीय सल्लागार कंपनीने तयार केला आहे. विशेष म्हणजे IIT मुंबई ने याला मान्यता दिली असून, सध्या या प्रस्तावाची अंतिम मंजुरी सरकारकडून घेतली जात आहे. एकदा मंजुरी मिळाल्यानंतर पुढील १२ महिन्यांत बांधकाम सुरू होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
वेळेची होणार बचत
सध्या बदलापूरहून मुंबईपर्यंत प्रवास करताना प्रवाशांना लोकल रेल्वेमधील गर्दी आणि वेळेचा मोठा खर्च सहन करावा लागतो. बहुतांश वेळा हा प्रवास दीड ते दोन तासांपर्यंत जातो. मात्र प्रस्तावित मेट्रो मार्ग पूर्णत्वास गेल्यानंतर हा प्रवास केवळ ६० मिनिटांत पूर्ण होणार आहे. यामुळे केवळ प्रवाशांचा वेळ वाचणार नाही, तर मुंबईच्या लोकलवरचा ताणही कमी होईल. सोबतच बदलापूर आणि त्याच्या आसपासच्या भागात नागरीकरण, व्यावसायिक वाढ, रिअल इस्टेट विकास आणि रोजगारनिर्मितीच्या मोठ्या संधी निर्माण होणार आहेत.
हा प्रकल्प बदलापूरसाठी केवळ एक वाहतूक सेवा न राहता भविष्यातील आर्थिक आणि सामाजिक परिवर्तनाचं प्रवेशद्वार ठरणार आहे. बदलापूरसारख्या शहराचा मुंबईच्या मुख्य नेटवर्कमध्ये समावेश होणे ही निश्चितच एक ऐतिहासिक आणि दूरगामी परिणाम घडवणारी बाब आहे. या प्रकल्पामुळे संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशात सार्वजनिक वाहतुकीच्या पायाभूत सुविधांमध्ये क्रांतिकारी बदल घडेल, अशी अपेक्षा आहे.
मेट्रोच्या गतीमुळे बदलापूरसारख्या ठिकाणी केवळ प्रवासाचा अनुभव बदलणार नाही, तर संपूर्ण जीवनशैलीत गतिमानता येईल. त्यामुळे हा प्रकल्प बदलापूर आणि आजूबाजूच्या भागासाठी एक ‘गेम चेंजर’ प्रकल्प ठरणार यात शंका नाही.




