सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सातारा नगरपालिकेची नवीन इमारत ज्याठिकाणी उभी राहणार आहे. त्या जागेचे सपाटीकरणाचे काम वेगाने सुरु आहे. पालिकेची इमारत भव्य आणि प्रशस्त असण्याकरता बाबा कल्याणी यांनी जिल्हा परिषदेच्या समोरची जागा ही केवळ 1 रुपयात पालिकेला दिली होती. त्या जागेचे कामाला मंजुरी मिळताच भव्य असा कार्यक्रम घेण्यात आला होता. गेल्या तीन दिवसांपासून या जागेवर स्वच्छता करण्यात आली असून सपाटीकरणाचे काम सुरु केले आहे. येत्या आठवडाभरात नवीन इमारत उभारणीच्या कामाचा प्रत्यक्ष शुभारंभ होण्याची शक्यता आहे.
नगरपालिकेच्या जुन्या इमारतीमध्ये छताला गळती लागली असून छत्रपती शिवाजी महाराज सभागृहाकडे जाताना पाणी गळत आहे. जुन्या इमारतीमध्ये अनेक त्रुटी आणि अपुरी पडत असल्याने नगराध्यक्षा माधवी कदम यांच्या कार्यकाळात दानशूर बाबा कल्याणी यांनी 1 रुपयात पालिकेच्या नव्या इमारतीला मोक्याच्या ठिकाणची जागा भेट म्हणून देण्यात आली. दिलेल्या 1 रुपयाच्या जागेत प्रशस्त अशी पालिकेची इमारत उभी करण्यासाठी प्रशासनाच्यावतीने डिझाईन करण्यासाठी खास स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्या स्पर्धेमध्ये अनेकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेतील उत्कृष्ट डिझाईन करणाऱ्यांचा खासदार उदयनराजेंच्या हस्ते गौरव करण्यात आला होता.
नगरपालिकेच्या इमारतीच्या नव्या जागेत उदयनराजेंच्या हस्ते कार्यक्रम पार पडला होता. भूमिपूजन झालेल्या जागेवरच पालिकेच्या वतीने टीऍण्डटी या कंपनीने गेल्या तीन दिवसांपासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली आहे. यामुळे सातारा पालिकेला लवकरच नवीन इमारत मिळणार आहे. पालिकेच्या नव्या इमारतीचे काम सुसज्ज आणि चांगले होण्यासाठी सुमारे 72 कोटी रुपयांचा निधी त्या उपक्रमासाठी मंजूर झालेले आहेत. त्यातून हे काम सुरु आहे. सर्व बाबींचा आराखडा करुन ठेकेदार टीऍण्डटी कंपनीच्या माध्यमातून काम केले जात आहे.