हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या बाजारात सिमकार्ड घेण्याच्या प्रमाणात मोठी वाढ होताना दिसत आहे. लोक चणे फुटाणे विकत घ्यावेत तसे सिमकार्ड विकत घेत आहेत. रिचार्ज संपलाय, फॅन्सी नंबर हवाय, खूप लोकांकडे नंबर गेलाय अशा अनेक कारणांमुळे लोक नवे सिमकार्ड विकत घेत आहेत. मुख्य म्हणजे असे सिमकार्ड विकत घेऊन लोकांची फसवणूक करण्याचे प्रमाण देखील वाढत आहे. त्यामुळे आता सिमकार्डची खरेदी विक्रीसाठी एक नविन नियम लागू करण्यात आला आहे.
आता इथून पुढे आपल्याला नवीन सिमकार्ड सहज खरेदी करता येणार नाही. सिमकार्ड खरेदीची प्रक्रिया सुरक्षित करण्यासाठी भारत सरकारने एक मोठा नियम लागू केला आहे. टेलिकम्युनिकेशन विभागाकडून सिमकार्ड खरेदीचे नियमन करण्यासाठी दोन परिपत्रके जारी करण्यात आली आहेत. नव्या नियमानुसार आता सिमकार्ड विकणाऱ्यांना अति काळजी घ्यावी लागणार आहे. सिमकार्ड खरेदी करणारा कोण आहे त्याची तपासणी केल्यानंतरच विक्रेत्यांना ते सिम कार्ड खरेदीदारांना देता येणार आहे. जर दुकानदारांनी याची तपासणी केली नाही तर त्यांना दहा लाख रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकतो.
1 ऑक्टोंबरपासून नियम लागू
दूरसंचार विभागाने जाहीर पत्रकात म्हटले आहे की, येत्या 1 ऑक्टोंबरपासून बनावट सिमकार्डची विक्री रोखण्यासाठी बनवण्यात आलेले नवीन नियम लागू होतील. ३० सप्टेंबरपूर्वी टेलिकम्युनिकेशन कंपन्यांना त्यांचे सर्व पॉईंट ऑफ सेल (POS) नोंदणीकृत करावे लागणार आहे. तसेच, या कंपन्यांना सिम कार्डची विक्री करणाऱ्या दुकानांची देखील तपासणी करावी लागणार आहे. दुकानदारांकडून नियमांचे पालन करून घेण्याची जबाबदारी टेलिफोन कंपन्यांची असणार आहे.
त्याचबरोबर दुसऱ्या महत्त्वाच्या नियमानुसार, आता इथून पुढे जर तुमचे सिम कार्ड हरवले किंवा ते खराब झाले तर नवीन सिम कार्ड घेण्यापूर्वी तुम्हाला सरकारने जारी केलेल्या सर्व नियमन प्रक्रियेतून जावे लागणार आहे. योग्य लोकांच्या हातात सिमकार्ड दिले जात आहे का याची तपासणी करण्यासाठी सरकार काही महत्त्वाच्या कागदपत्रांची तपासणी करेल. ही संपूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर तुम्हाला नवीन सिमकार्ड देण्यात येईल.