नायलॉन मांजाने दुचाकीस्वार महिलेचा कापला गळा

औरंगाबाद – बाजारात खरेदी करून घरी परतणाऱ्या दुचाकीस्वार महिलेचा पतंगाच्या नायलॉन मांजाने गळा कापला गेल्याची घटना काल सायंकाळी गुलमंडी परिसरात घडली. या घटनेत जखमी झालेल्या महिलेवर पदमपुरा परिसरातील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. शुभांगी सुनील वारद (45, रा. क्रांती चौक परिसर) असे जखमी महिलेचे नाव आहे.

शुभांगी या काल सायंकाळच्या सुमारास गुलमंडी परिसरात खरेदीसाठी गेल्या होत्या. खरेदी झाल्यानंतर त्यात दुचाकी घेऊन घरी निघाल्या असता गुलमंडी ते मेच्वेल्ल दरम्यान अचानक पतंगाचा नायलॉन मांजा त्यांच्या गळ्यात अडकला. कुणीतरी हा दोरा ओढल्यासारखे झाल्याने त्यांनी प्रसंगावधान राखून दुचाकी थांबून गळ्यात अडकलेला दोर पकडला. मात्र तोपर्यंत त्यांचा गळा चिरला गेल्याने झालेल्या जखमेतून रक्त निघू लागले.

ही बाब त्यांनी त्यांच्या पतिला कळवली त्यानंतर ॲड. सुनील वारद यांनी जखमी पत्नीला खाजगी दवाखान्यात दाखल केले.