व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

औषधे डिलीव्हरी देण्यासाठी आलेल्या एकाने 2 लाख 10 हजार केले लंपास

कोल्हापूरातून एकास अटक

सातारा | खिंडवाडी (ता. सातारा) येथील वृद्धाच्या घरातून एटीएम चोरून दोन लाख दहा हजार रुपये काढणाऱ्यास शहर पोलिसांनी अटक केली आहे. अजित पांडुरंग नांगरे (वय -36, रा.भादुले, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) असे त्याचे नाव आहे. याबाबत शिवाजी साहेबराव चव्हाण (वय- 65) यांनी फिर्याद नोंदविली होती. 21 डिसेंबरला त्यांच्या घरातून युनियन बँकेचे एटीएम कार्ड अनोळखी व्यक्तीने चोरून नेले. त्यानंतर त्यांच्या बँकेच्या खात्यातून तब्बल 2 लाख 10 हजार रुपये काढण्यात आले.

बँकेत पैसे काढण्यासाठी गेल्यावर खात्यातून दोन लाख रुपये काढले गेल्याचे त्यांना बँकेने सांगितले. त्यानंतर त्यांनी याबाबत शहर पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदविली होती. उपनिरीक्षक कदम या गुन्ह्याचा तपास करत होते. तपासादरम्यान पोलिसांनी चव्हाण यांच्याकडे चौकशी केली. त्यावरून नांगरे याच्यावर पोलिसांचा संशय बळावला. त्यांनी त्याला भादुले या गावातून अटक केली. पोलिस कोठडीमध्ये केलेल्या चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

पोलिसांनी त्याच्याकडून एटीएम व 1 लाख ८० हजार रुपये रोख रक्कम हस्तगत केली आहे. तो चव्हाण यांच्या घरी आयुर्वेदीक औषधे देण्यासाठी आला होता. त्यांच्या वृद्धत्वाचा फायदा घेत त्याने एटीएम लंपास केले होते. पोलिस निरीक्षक भगवान निंबाळकर व वंदना श्रीसुंदर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण विभागाचे उपनिरीक्षक समीर कदम, सुजित भोसले, अविनाश चव्हाण, अभय साबळे, पंकज ढाणे, विक्रम माने, संतोष कचरे, सागर गायकवाड, गणेश घाडगे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.