कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी
पुणे- बंगलोर महामार्गावर कराड शहराजवळ उड्डाण पूल पाडण्याच्या कामामुळे आज सकाळपासून ट्रॅफिकचा सामना सर्वसामान्यांना करावा लागला. जवळपास 3 ते 4 तास वाहनचालकांना तसेच प्रवाशांना वाहतुक कोंडीत अडकले होते. यावेळी मुंबईतून माजी मुख्यमंत्री व कराड दक्षिणचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी एक फोन केला अन् ट्रॅफिक क्लिअर झाल्याचे पहायला मिळाले.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण मुंबईत अधिवेशनात असल्याने अनेक नागरिकांनी फोनद्वारे संपर्क साधला. तसेच ट्रॅफिकमुळे नागरिकांचे हाल होत असल्याची माहिती दिली. आजची सकाळ कराडकरांसाठी तसेच महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी अत्यंत त्रासदायक होती. दहावी- बारावीच्या परिक्षार्थी विद्यार्थ्यांना त्रास झाला. या सर्वांची माहिती मिळताच आ. पृथ्वीराज चव्हाण मुंबईतूनच संबधित प्रशासन अधिकाऱ्यांना त्यांनी एक फोन केला. तसेच लवकरात लवकर ट्रॅफिकची समस्या सोडविण्यासाठी सूचना केली. त्यानंतर अवघ्या काही वेळातच ट्रॅफिकची समस्या सुटली. त्यामुळे बाबाचा एक फोन अन् ट्रॅफिक क्लिअर झालेले पहायला मिळाले. यामध्ये प्रामुख्याने बंद करण्यात आलेला उड्डाणपूल पुन्हा वाहतूकीस खुला करण्यात आला.
नागरिकांनो वाहतुकीचे नियम पाळा ः- आ. पृथ्वीराज चव्हाण
कराड येथील कोल्हापूर नाका व ढेबेवाडी फाट्यावरील सध्याचे उड्डाणपूल पाडून नव्याने सहापदरी उड्डाण पूल उभारण्यात येणार आहे. त्यासाठी सध्या काम सुरू आहे. या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी संबधित सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांची व ठेकेदार कंपन्याच्या अधिकाऱ्यांची बैठक घेवून सूचना दिल्या होत्या. परंतु आजच्या प्रकारामुळे बंद करण्यात आलेला उड्डाणपूल पुन्हा खुला करायला लावला. तसेच जोपर्यंत पर्यायी वाहतूक व्यवस्था होत नाही, तोपर्यंत मार्ग बंद करू नये. तसेच नागरिकांनीही वाहतूकीचे नियम पाळावेत, असे आवाहन आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. यावेळी संबधित अधिकाऱ्यांशी स्वीय सहाय्यक गजानन आवळकर यांनी संपर्क साधत सर्व घटनेवर लक्ष ठेवून होते.