पुणे मेट्रोच्या प्रवाशांसाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. पुणेकरांसाठी मेट्रोच्या प्रवासाचा अनुभव अधिक सोयीस्कर आणि वेगवान होणार आहे. सध्या पुण्यात दोन मेट्रो मार्ग सक्रिय आहेत—पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी. या मार्गांमुळे पुणेकरांचा प्रवास अधिक सुलभ आणि सुपरफास्ट झाला आहे.
आता पुणे मेट्रोने एक नवा ‘लास्ट माइल कनेक्टिव्हिटी’ उपक्रम सुरू केला आहे, ज्यामुळे प्रवाशांना मेट्रो स्टेशनपर्यंत पोहोचणे आणखी सोयीचे होईल. यासाठी भाडेतत्त्वावरील ई-स्कूटर सेवा सुरू करण्यात आली आहे, जी प्रवाशांसाठी एक मोठा दिलासा ठरणार आहे.
प्रायोगिक तत्त्वावर ई-स्कूटर सेवा
महामेट्रो प्रशासनाने पुण्यात आनंदनगर स्थानक ते एमआयटी विद्यापीठ मार्गावर प्रायोगिक तत्त्वावर या ई-स्कूटर सेवेला सुरूवात केली आहे. यामध्ये, जेनेसिस इलेक्ट्रिक मोबिलिटी कंपनीतर्फे परवडणाऱ्या दरात स्कूटर उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या उपक्रमामुळे प्रदूषणात घट होईल आणि नागरिकांचे पैसेही वाचतील. यामुळे या सेवेला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.
कसे करता येईल बुकिंग?
प्रवाशांना ई-स्कूटर बुक करण्यासाठी एक खास ॲप उपलब्ध होईल. यामध्ये ई-मेल आणि आधार क्रमांकाच्या सहाय्याने ट्रॅकिंग देखील करता येईल. स्कूटरचे भाडे प्रतिमिनिट 3 रुपये असणार आहे. अर्ध्या युनिट चार्जिंगमध्ये स्कूटर 30 किलोमीटरपर्यंत प्रवास करू शकते. सर्व बुकिंग आणि भाडे ऑनलाईन केले जाऊ शकते.
या उपक्रमाला पुणे मेट्रो प्रशासनाने दहा मेट्रो स्थानकांमध्ये विस्तारण्याचे नियोजन केले आहे. त्यात पिंपरी चिंचवड मधील मेट्रो स्थानकांचा समावेश देखील आहे. यामुळे प्रवाशांना आणखी सोयीस्कर आणि पर्यावरणपूरक प्रवासाची सुविधा मिळणार आहे. हे उपक्रम मेट्रो प्रवाशांसाठी एक महत्त्वाची आणि दिलासादायक प्रगती आहे, ज्यामुळे पुण्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणखी सक्षम होईल.