औरंगाबादेत खुनांची मालिका सुरूच; मुकुंदवाडीत दोन दिवसांत दोन महिलांची हत्या

औरंगाबाद – शहरात खूनाची मालिका संपता संपत नसल्याचं चित्र आहे. मुकुंदवाडी परिसरात दोन दिवसांत दोन महिलांचा खून झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. याता 22 वर्षीय युवती आणि 39 वर्षीय विवाहितेचा समावेश आहे. यातील युवती सोमवारी नेहमीप्रमाणे कामावर गेली होती, मात्र नंतर घरी परतलीच नाही. मंगळवारी सकाळी मुकुंदनगर भागातील मोकळ्या मैदानात तिचा मृतदेह आढळला. यातील 22 वर्षीय मृत मुलीचे नाव इंदुमती बारकुराय असे आहे. तर सुनिता पोपट चिनगारे असे विवाहित महिलेचे नाव आहे. मागील काही दिवसांपासून औरंगाबाद शहरात खुलेआम खुनाच्या घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पहिल्या घटनेत बारावीपर्यंत शिक्षण घेतलेली इंदुमती एका मोबाइल कंपनीच्या दालनात आठ दिवसांपूर्वीच कामाला लागली होती. मुकुंदनगरमध्ये वडील आणि दोन भावांसोबत ती राहत असे. तिचे वडील आणि भाऊ मजुरी करतात. सोमवारी इंदुमती सकाळी कामावर गेली होती. मात्र संध्याकाळी सहा वाजले तरी ती परत आली नाही. त्यामुळे कुटुंबियांनी तिच्या मैत्रीणी, नातेवाईकांकडे शोध घेतला. मात्र तिचा शोध लागला नाही. मंगळवारी सकाळी मुकुंदनगरपासून बायपासच्या दिशेने असलेल्या मोकळ्या मैदानावर दूध विक्रीसाठी जाणाऱ्या काही महिलांना तिचा मृतदेह दिसून आला. तिचा हात आणि गळ्यावर व्रण दिसत होते. माहिती मिळताच मुकुंदवाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मंगळवारी सकाळी तिचे वडील व भाऊ मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात ती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यासाठी गेले होते. परंतु तिचा मृतदेहच सापडल्याने त्यांना खूप धक्का बसला. याप्रकरणी भावाच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. इंदुमतीचे कुटुंब परराज्यातील असून काही वर्षांपूर्वी ते औरंगाबादमध्ये स्थायिक झाले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बारकुराय यांच्या गावाकडील एका मुलाशी तिची मैत्री होती. इंदुमतीचा मृतदेह आढळल्यापासून तो युवकदेखील बेपत्ता आहे. खूनाचा संशय त्याच्यावर असून पोलीस युवकाच्या शोधात पुण्याच्या दिशेने गेले होते. मारेकऱ्याचा माग काढण्यासाठी श्वानपथकाला पाचारण करण्यात आले होते. मृतदेहापासून काही अंतरावर तिचे कानातले पडले होते. तिचा गळा आवळल्याचे व्रण होते व हातावरही मारहाणीच्या खुणा होत्या.

मृत विवाहितेचा खून पतीनेच केला
दुसऱ्या घटनेत चारित्र्याच्या संशयावरून सुनिता शिनगारे यांच्या पतीनेच झोपेत गळा दाबून खून केल्याचे उघड झाले आहे. दोन दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेत सोमवारी डॉक्टरांनी शवविच्छेदनाचा अहवाल दिल्यानंतर या महिलेचा खून झाल्याचे स्पष्ट झाले. तोपर्यंत पती पोपट रामराव शिनगारे हा पत्नीने आत्महत्या केल्याचे सांगत होता. मात्र पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने खुनाची कबूली दिली. मूळ अंजनडोह येथील रहिवासी असलेला हा पती मजुरी करत होता. तो नेहमीच पत्नीला मारहाण करत असे, अशी माहिती पोलिसांच्या तपासात उघड झाली आहे.

You might also like