ठाणे महापालिकेच्या रुग्णालयात पुन्हा घडला धक्कादायक प्रकार; पोलिसांची तातडीनं कारवाई

Thane Hospital
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात शवविच्छेदन प्रक्रिया नको म्हणून आपल्या आठ महिन्यांच्या बाळाला घेऊन बाप पसार झाला असल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी त्वरित पोलिसांशी संपर्क साधून बाळाच्या मृतदेहाला ताब्यात घेतले आहे. तर बाळाच्या वडिलांवर देखील कारवाई करण्यात आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण रुग्णालयात खळबळ माजली होती. परंतु आता या बाळाला शोधण्यात पोलिसांना यश आले आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री रुग्णालयात आठ महिन्याच्या बाळाला उपचारासाठी आणले गेले होते. मात्र पहाटेच बाळाचा मृत्यु झाला. या बाळाला जेव्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यावेळी त्याला न्युमोनिया आणि खोकल्याच्या औषधाचा ओव्हर डोस झाल्याचं डॉक्टरांच्या निदर्शनात आल होत. त्यामुळे या बाळाचं मृत्यूनंतर शवविच्छेदन करावं लागेल अशी माहिती डॉक्टरांनी त्याच्या कुटुंबीयांना दिली होती. परंतु शवविच्छेदन करण्यास बाळाच्या वडिलांनी विरोध दर्शवला. शेवटी वडील बाळाला घेऊन पसार झाले.

वॉर्डमधून बाळ गायब झाल्याची माहिती कर्मचाऱ्यांना मिळतात बाळाची शोधाशोध सुरू झाली. यामुळे रुग्णालयात देखील गोंधळ उडाला. यानंतर रुग्णालय प्रशासनाने त्वरित पोलिसांची संपर्क साधून घडलेल्या घटनेची माहिती दिली. पुढे पोलिसांनी आपल्या तपासात शिळ डायघर बाळाला आणि त्याच्या वडिलांना ताब्यात घेतले. आता या बाळाला रुग्णालयात आणले गेले आहे. तसेच त्याच्यावर पुढील प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सर्व प्रक्रियेनंतर या बाळाला त्याच्या कुटुंबाच्या ताब्यात दिले जाईल.

दरम्यान, बाळाला घेऊन जाताना रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी त्याच्या वडिलांना थांबवण्याचा प्रयत्न केला होता मात्र तो यशस्वी ठरला होता. या बाळाला औषधांचा ओवरडोस झाल्यामुळे आणि 24 तासांत मृत्यू यामुळे त्याचे कायदेशीर शवविच्छेदन करणे गरजेचे होते याबाबतची माहिती पोलिसांना देखील देण्यात आली होती. परंतु शवविच्छेदन करण्यापूर्वीच वडिल बाळाला घेऊन पसार झाले. ही सर्व माहिती रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ.अनिरुद्ध माळगावकर यांनी दिली आहे.

एकाच रात्री 18 रुग्णांचा मृत्यू

गेल्या एका महिन्यापूर्वी याच ठाणे महापालिकेच्या रुग्णालयात एकाच रात्री अठरा रुग्णांचा मृत्यू झाल्याचे धक्कादाय घटना घडली होती. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात ठाणे रुग्णालय चर्चेत आले होते. या प्रकारे रुग्णांच्या कुटुंबांनी ठाणे रुग्णालयाच्या प्रशासनावर गंभीर आरोप केले होते. परंतु हे सर्व आरोप रुग्णालयाच्या डॉक्टरांकडून फेटाळण्यात आले होते. त्यानंतर अपुऱ्या यंत्रणेमुळे आणि कमी पडलेल्या सुविधांमुळे या रुग्णांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले होते. आता याच रुग्णालयात ही दुसरी धक्कादायक घटना घडली आहे.