औरंगाबाद | सोमवारी मुंबई येथील अँटी करप्शन ब्युरो एसीबीच्या पथकाने आरटीओ कार्यालयात छापा मारला. यानंतर काही वेळ त्या ठिकाणी खळबळ उडाली होती. तर काहीजण अभिनंदनही करत होते.
मुंबई येथील अँटी करप्शन ब्युरो (एसीबी) च्या पथकाने सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) स्वप्निल माने आणि एका खासगी व्यक्तीची वेदांतनगर पोलिस ठाण्यात कसून चौकशी केली. ही चौकशी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. हाती आलेल्या माहितीनुसार, मुंबई पथकाने या व्यक्तीला लाच घेताना अटक केली. नंतर पथकाने सहाय्यक आरटीओ स्वप्नील माने यांच्या केबिनमध्ये चौकशी केली आणि नंतर हे पथक माने आणि त्या खासगी व्यक्तीला वेदान्तनगर पोलिस ठाण्यात घेऊन गेले. ड्रायव्हिंग स्कूल मालकाने दिलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली होती.
या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईबाबत आरटीओ कार्यालयाला माहिती नव्हते. या घटनेनंतर बराच वेळ खळबळ उडाली. शेवटी आरटीओच्या पापांचा घडा कधी भरेल अशी चर्चा सुद्धा नागरिकांमध्ये रंगली होती. त्याचबरोबर आरटीओत भ्रष्टाचाराची बाब नवी नाही अशीही चर्चा होत होती.