Friday, June 2, 2023

कोल्हापूरला कांदे घेवून जाणारा ट्रक महामार्गावर पलटी

कराड | पुणे- बंगलोर महामार्गावर कराड येथील वारणा हाॅटेलसमोर ट्रक पलटी झाल्याची घटना आज दि. 16 रोजी पहाटे घडली. या अपघातात कांदा बागायतदार जखमी झाला आहे. सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झालेली नाही.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, कराड येथील महामार्गावर असणाऱ्या हाॅटेल वारणा समोर पहाटे 4 वाजता हा अपघात झाला. या अपघातात ट्रक क्रमांक (एमएच- 04- सीपी- 5124) नुकसान झाले आहे. सदरचा ट्रक श्रीगोंदा येथून कांदे भरून कोल्हापूरला जात होता. कराड येथील उड्डाण पूलावरून खाली उतरल्यानंतर अचानक स्टेरींगचे राॅड फेल झाल्याने अपघात झाला.

स्टेरींगचे राॅड फेल झाल्याने ट्रक चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. महामार्गावर असलेली सुरक्षा रेलींग जाळी तोडून ट्रक सर्व्हीस रस्त्यावर पलटी झाला. ट्रकमध्ये दोघेजण होते, यामधील कांदा बागायतदार प्रणय जाधव (वय- 19 वर्षे) हा किरकोळ जखमी झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच कराड शहर पोलिस स्टेशनला माहिती मिळताच पोलिस कर्मचारी खालिल इनामदार, सतिश जाधव, हायवे हेल्पलाइन पेट्रोलिंग इन्चार्ज दस्तगीर आगा, सिकंदर उघडे यांनी घटनास्थळी धाव घेवून सहकार्य केले.