हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोल्हापूरला जोतिबा देवाच्या यात्रेसाठी निघालेल्या वाठार स्टेशन (ता. कोरेगाव) येथील दिंडीतील वारकऱ्यांना कराड हद्दीत ट्रकने धडक दिली. या अपघातात तीन जण जखमी झाले असून, त्यातील एक जण गंभीर आहे. त्याच्यावर कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पुणे- बंगळूर आशियाई महामार्गावर कराड तालुक्यातील वाठार गावच्या हद्दीतील ब्रीजवर रविवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातात प्रतीक सुभाष यादव (वय- 23) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. तर आशुतोष गोपाळ नावडकर (वय- 23) व शुभम सुनील नावडकर (वय- 23, सर्व रा. राऊतवाडी- वाठार स्टेशन, ता. कोरेगाव) हे दोघे किरकोळ जखमी झाले आहेत.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, वाठार स्टेशन येथून सुमारे पन्नास वारकऱ्यांची दिंडी जोतिबा देवाचे यात्रेसाठी निघाली होती. कराडजवळ एका हॉलमध्ये थोडी विश्रांती घेऊन रविवारी रात्री ही दिंडी पुढे जोतिबाला जाण्यासाठी महामार्गावरून निघाली. दरम्यान, दिंडीतील काही वारकरी पुढे गेले, तर चौघे जण पाठीमागे राहिले. महामार्गाच्या सर्व्हिस रस्त्यावरून जाताना अनेक ठिकाणी सर्व्हिस रस्ता उकरलेला होता. साहित्य सर्व्हिस रस्त्यावर टाकले होते. त्यामुळे तेथून जाणे शक्य नसल्याने वारकरी वाठार गावच्या हद्दीत महामार्गाच्या कडेने ब्रीजवरून निघाले.
त्याचवेळी पाठीमागून आलेल्या ट्रकने महामार्गाच्या कडेने चालत जात असलेल्या वारकऱ्यांना धडक दिली. यामध्ये प्रतीक यादव गंभीर जखमी झाले, तर इतर दोघे जण किरकोळ जखमी झाले. जखमींना त्वरित रुग्णालयात हलवले असून, प्रतीक यादव याच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातानंतर ट्रकचालक न थांबता ट्रकसह पळून गेला आहे.