सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे
इस्लामपूर येथील प्रकाश हॉस्पिटल अॅण्ड रिसर्च सेंटरमध्ये काम करणाऱ्या डॉक्टर्स, नर्सेस व इतर सहकारी कर्मचाऱ्यांच्यावर दाखल होत असलेले खोटे गुन्हे मागे घ्यावेत म्हणून प्रकाश हॉस्पिटल अॅण्ड रिसर्च सेंटरच्या प्रवेशद्वारासमोर प्रकाश कामगार युनियनच्या वतीने आजपासून लाक्षणिक उपोषण सुरू करण्यात आले. आम्ही कोरोना योध्दा, आम्हाला न्याय द्या, आमच्या सहकारी स्टाफवर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घ्या, पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हुकुमशाहीचा धिक्कार असो, पोलिस मित्रांनो राजकीय दबावाला बळी पडु नका अशा घोषणा देऊन कामगारांनी आपली तीव्र भावना व्यक्त केली.
योगेश खोत पालकमंत्री जयंत पाटील यांचा समर्थक व राष्ट्रवादी पक्षाचा क्रियाशील कार्यकर्ता असल्याचे सांगत राजकीय द्वेषापोटी पोलिस प्रशासनावर दबाव आणुन गुन्हा दाखल करण्याची मालिका राष्ट्रवादी व पोलिस प्रशासनाने संगनमताने सुरू केल्याचा आरोप पहिल्या दिवसाच्या उपोषणात प्रकाश कामगार युनियनच्या कामगारांनी केला. पोलिस प्रशासने राजकीय दबावाला बळी न पडता तक्रारीची सत्यता पडताळुन गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली.