हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| महाराष्ट्र सरकारने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्यात (DA) 12 टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही वाढ 1 जुलै 2024 पासून लागू करण्यात आली आहे. या निर्णयामुळे तब्बल 17 लाख कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्याचा लाभ मिळणार आहे. तसेच, हा निर्णय सरकारी कर्मचाऱ्यांना (Government Employees) मोठा दिलासा देणारा ठरला आहे.
राज्याच्या वित्त विभागाने यासंदर्भात अधिकृत आदेश जारी केला आहे. यानुसार पाचव्या वेतन आयोगाच्या अपरिवर्तित वेतनश्रेणीअंतर्गत महागाई भत्ता 433 टक्क्यांवरून 455 टक्के करण्यात आला आहे. सुधारित दरानुसार फेब्रुवारी 2025 च्या पगारासह कर्मचाऱ्यांना रोख स्वरूपात महागाई भत्ता मिळणार आहे. यात 1 जुलै 2024 ते 31 जानेवारी 2025 या कालावधीतील थकबाकीही दिली जाणार आहे.
राज्य कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा
महागाई भत्त्यात वाढ झाल्याने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे. राज्यातील महागाई सतत वाढत असताना वेतनवाढीबाबत कर्मचाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर मागणी केली जात होती. त्यामुळे सरकारच्या या निर्णयाचे स्वागत होत आहे. सरकारी आदेशात असे स्पष्ट सांगितले आहे की, महागाई भत्त्याच्या वितरणासंदर्भातील विद्यमान प्रक्रिया आणि तरतुदी भविष्यातही लागू राहतील. तसेच, या वाढीमुळे येणारा खर्च कर्मचाऱ्यांसाठी वेतन आणि भत्त्यांच्या संबंधित शीर्षकांतर्गत अर्थसंकल्पीय तरतुदीमधून भागवला जाणार आहे.
दरम्यान, या निर्णयाचा लाभ केवळ राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनाच नव्हे, तर अनुदानित संस्थांमधील कर्मचारी आणि जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनाही मिळणार आहे. त्यांच्या महागाई भत्त्याचा खर्च त्यांच्या आर्थिक मदतीसाठी निर्दिष्ट केलेल्या उप-शीर्षकांतर्गत नोंदवला जाणार आहे. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने घेतलेला हा निर्णय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.