सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
ओझर्डे (ता. वाई) येथील कृष्णा नदीच्या पात्रात पोहण्यासाठी गेलेला शिरगावमधील वेदांत वसंत चव्हाण (वय16) हा युवक बुडल्याची घटना रविवारी घडली. या घटनेनंतर सायंकाळी उशिरापर्यत महाबळेश्वर ट्रेकर्सकडून नदीपात्रात युवकाचा शोध घेतला जात होता. मात्र, काहीच हाती आले नसल्याने सायंकाळी उशिरा शोध मोहीम थांबवण्यात आली.
याबाबत घटनास्थळावरून पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शिरगाव गावची यात्रा जवळ आल्याने घरातील गोधड्या धुण्यासाठी शिरगावमधून लोक रविवारी सकाळी ओझर्डे येथील कृष्णा नदी काठी आले होते. गोधड्या धुवून आंघोळ करण्यासाठी वेदांत हा नदीत पोहण्यासाठी उतरला होता. मात्र, नदीचे पात्र अत्यंत खोल असल्यामुळे आणि दुसरीकडे वेदांत गोधड्या धुलाईमुळे दमलेला असल्यामुळे तो पाण्यातून बाहेर येताना बुडू लागला.
यावेळी त्याला नदीपात्रातून बाहेर येताना काठावर असलेल्या ग्रामस्थांनी पाहिले व त्याला वाचवण्यासाठी त्यांनी प्रयत्नही केला. परंतु तो नदी पात्रात बुडाला. या अचानकपणे घडलेल्या प्रकारानंतर त्या ठिकाणी असलेल्या काही पोहणाऱ्या लोकांनी नदीत उडी घेतली. आणि वेदांतचा शोध घेण्यास सुरुवात केली. परंतु त्याचा शोध लागला नाही. त्यानंतर ग्रामस्थांनी या घटनेची माहिती भुईज पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी दुपारी महाबळेश्वर ट्रेकर्सना बोलवून शोध मोहीम राबविली. मात्र, सांयकाळी उशिरापर्यत वेदांतचा शोध लागला नव्हता.