पेठ येथील तरुणाकडून तीन गावठी कट्टे अन काडतुसांसह सव्वा लाखांचा मुद्देमाल हस्तगत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

वाळवा तालुक्यातील पेठ येथे राहणाऱ्या तरुणाला सांगलीतील संजयनगर मध्ये गावठी कट्टा विक्रीसाठी आला असता सापळा रचून पकडण्यात आले. अमोल अर्जुन शेलार असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्याकडून गावठी बनावटीचे तीन पिस्टल आणि ४ जिवंत काडतुसे असा एकूण १ लाख ११ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. शेलार याच्या विरोधात संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे एक पथक संजयनगर परिसरात पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी पथकातील कर्मचाऱ्यांना माहिती मिळाली कि, एक व्यक्ती देशी बनावटीचे हत्यार विक्रीसाठी येणार आहे. मिळालेल्या माहिती प्रमाणे पथकाने अभयनगर येथील देवकुळे हॉस्पिटल जवळ सापळा लावला. त्यावेळी एक जण पिशवी घेऊन संशयित रित्या त्या ठिकाणी थांबला होता. त्याला छापा टाकून पकडल्यानंतर त्याच्या जवळ गावठी बनावटीचे तीन पिस्टल आणि काडतुस सापडले. त्यावेळी पोलीस उपनिरीक्षक ढेरे यांनी हत्यार बाळगणेचा परवाना आहे का असे विचारता त्याने त्याचेकडे परवाना नसल्याचे सांगितले.

सदरची अग्नीशस्त्रे आणि काडतुसे सविस्तर पंचनाम्याने जप्त करुन त्यास ताब्यात घेवून त्याच्या विरोधात भारतीय शस्त्र अधिनियमचे कलम प्रमाणे संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच्याकडून ५० हजार रुपये किमतीचे दोन देशी बनावटीचे स्टील प्लेटिंग बॉडीचे पिस्टल, १८ एम एम बोर असलेला एक गावठी कट्टा आणि १ हजार २०० रुपये किमतीचे ४ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उप निरीक्षक दिलीप ढेरे, राहुल जाधव, सचिन कनप, अमोल ऐदाळे, सुधीर गोरे, संकेत मगदूम, राजू मुळे, संदीप पाटील आणि संतोष गळवे यांच्या पथकाने केली.

Leave a Comment