हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | 2019 विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात खूप मोठी राजकिय उलथापालथ झाली. मुख्यमंत्री पदावरून शिवसेना-भाजप हे मित्र एकमेकांचे शत्रू बनले आणि काँग्रेस राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले. उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विरोधी पक्षनेते व्हावं लागलं. आता येत्या काळात पुन्हा भाजप सोबत जाणार का असा प्रश्न पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना विचारण्यात आला. आदित्य ठाकरेंनी या प्रश्नाचे उत्तर आपल्या जबरदस्त अंदाजात दिले.
तुम्ही ज्यांच्यासोबत इतकी वर्षे एकत्र काम केलं, सरकार चालवलं, तेच आज तुमच्याविरुद्ध उभे ठाकले आहेत. ते आधीचं नातं संपलंय का? शिवसेना पुन्हा कधीही भाजपसोबत जाणार नाही का? राजकारणात कधीही कोणतंही वळण येऊ शकतं. तुमच्या बाबतीतही असं होऊ शकतं का?, असे प्रश्न आदित्य यांना विचारण्यात आले. त्यावर आम्ही कधीही कोणाशीही शत्रुत्व पत्करलं नाही. कोणाशीही वैयक्तिक वैर पत्करून बदल्याच्या भावनेनं राजकारण केलं नाही, असं उत्तर आदित्य यांनी दिलं.
‘आम्ही कोणावरही वैयक्तिक स्वरुपाची टीका केली नाही. आता समीकरणं बदलली आहेत. जिथे आम्हाला विश्वास मिळाला आहे, मैत्रीचा हात मिळाला आहे. ज्यांना आम्ही मित्र समजत होतो, ते आम्हाला शत्रू समजू लागले आहेत आणि ज्यांना आम्ही विरोधी पक्ष समजत होतो, त्यांनी आम्हाला मैत्रीचा हात दिला आणि राज्याच्या विकासासाठी पुढे आले. हे एक नवं समीकरण आहे. आम्ही राज्य आणि देशाच्या कल्याणासाठी चांगलं काम करू,’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन केलेल्या शिवसेनेला हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून वारंवार शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जातो. त्यावरून आदित्य ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलं. ‘भाजप जम्मू-काश्मीरमध्ये पीडीपीसोबत युती करू शकतो. बिहारमध्ये संयुक्त जनता दलासोबत हातमिळवणी करू शकतो. भाजप अशा पक्षांसोबत युती करतो आणि दुसऱ्यांना हिंदुत्वाबद्दल प्रमाणपत्र देतो. शिवसेनेत भावनेला महत्त्व आहे आणि प्रत्येक शिवसैनिक आमच्या कुटुंबाचा सदस्य आहे,’ असं आदित्य ठाकरे म्हणाले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’