आषाढी वारीसाठी 4700 एसटी गाड्या; ‘या’ बसस्थानकातून व्यवस्था

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आषाढी वारीनिमित्त पंढरपूरसाठी 4700 विशेष गाड्या सोडणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांनी केली आहे. त्यामुळे वारकऱ्यांचा पंढरपूर प्रवास सुखकर होणार आहे. एकूण 6 बसस्थानक मधून या गाड्या सुटणार आहेत.

6 जुलै ते 14 जुलै पर्यंत या विशेष गाड्या सुरू असणार आहेत. औरंगाबाद मधून 1200, पुण्यातून 1200, मुंबईहून 500, नाशिक 1000, अमरावती मधून 700 आणि नागपूर येथून 100 गाड्या सोडण्याचे नियोजन आहे. लाखो भाविक प्रवाशांना सुरक्षित सेवा देण्यासाठी एसटीचे चालक, वाहक, यांत्रिक कर्मचारी तसेच अधिकारी वर्गही अहोरात्र कार्यरत राहणार आहेत, अशी माहिती मंत्री अनिल परब यांनी दिली.

पंढरपूर आगार आणि चंद्रभागा बसस्थानक येथे मुंबई, ठाणे, रायगड, सातारा, पुणे विभाग आणि सोलापूर रोड लगत सूतगिरणी मैदानात भीमा बसस्थानकात औरंगाबाद, नागपूर व अमरावतीचे बस थांबतील. विठ्ठल कारखाना बसस्थानकात नाशिक, जळगाव, धुळे, अहमदनगर विभाग, आयटीआय कॉलेजजवळ पांडुरंग बसस्थानकात सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग विभागातील बसेस थांबणार आहेत.

पंढरपूरची आषाढीयात्रा हा महाराष्ट्रातील सर्व सामान्य जनतेचा जिव्हाळ्याचा विषय आहे. गेली दोन वर्षे कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरकडे रवाना होणाऱ्या पालख्यांचा सोहळा साधेपणाने करण्याच्या सूचना राज्य शासनाने दिल्या होत्या. मात्र आता कोरोनाचे सावट कमी झाल्यामुळे दोन वर्षांनंतर यंदा वारी सोहळा होणार आहे.

Leave a Comment