अबब !!! 20 हजार लिटरच्या पेट्रोलच्या टँकरला लागली आग

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

इस्लामपूर – सांगली रोडवर आष्टा पोलीस ठाणे समोर पेट्रोल व डिझेल असा एकूण 20 हजार लिटरच्या तेलवाहू टँकरने अचानक पेट घेतला. आष्टा पोलिसांच्या सतर्कतेने वेळीच आग आटोक्यात येऊन मोठा अनर्थ टळला. सायंकाळी पावणे चार वाजण्याच्या सुमारास इस्लामपूर – सांगली रोडवर आष्टा पोलीस ठाणे समोर हिंदुस्थान पेट्रोलियमचा टँकरमध्ये इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किट होऊन अचानक पेट घेतला. हा टँकर हजारवाडी ते कोल्हापूर असा जात होता. चालक संजय तानाजी खोत याने प्रसंगावधान राखून टँकर रस्त्याच्या कडेला घेतला.

सदर टँकर मध्ये दहा हजार लिटर पेट्रोल व दहा हजार लिटर डिझेल असा ज्वलनशील माल होता. चालकाने गाडीतील डी सी पी फायर सिलेंडर घेऊन आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केला. सदरचा प्रकार पाहून आष्टा पोलीस ठाणेच्या कर्मचाऱ्यांनी तत्परतेने आष्टा पालिका, हुतात्मा साखर कारखाना वाळवा, सांगली महापालिका, इस्लामपूर पालिका यांच्या फायर ब्रिगेडशी संपर्क साधला.

घटनास्थळापासून नजीक असणारे तीन पेट्रोल पंप, चहा टपऱ्या व हॉटेल व नागरी वस्ती यामध्ये असणारे घरगुती व व्यवसायिक वापराचे गॅस सिलिंडर याचे गांभीर्य ओळखून आष्टा पोलिसांनी तात्काळ परिसरातील सिलिंडर सुरक्षित ठिकाणी हलवले. दरम्यानच्या काळात पोलिसांनी आष्टा पोलीस ठाणे मधील दोन व जवळील बेकरीतील एक असे तीन डी सी पी फायर सिलेंडर घेऊन आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केला. आष्टा पालिका, हुतात्मा साखर कारखाना वाळवा, सांगली महापालिका, इस्लामपूर पालिका यांच्या अग्निशामक विभागाच्या एकूण पाच गाड्यांनी आग आटोक्यात आणली व मोठा अनर्थ टळला.