अबब ! कोट्यवधींचा दंड भरूनही औरंगाबादकर चालवतात बेशिस्त ‘वाहने’

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद/ नवनीत तापडिया | मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहरात वाहतूकिची समस्या काही नवीन नाही. शहरात दिवसेंदिवस वाहतुकीचे तीन तेरा वाजत आहे. याला आपण वाहतूक शाखा, प्रशासनाला जबाबदार धरत असू तरी औरंगाबाद शहरातील सुशिक्षित नागरिक देखील तेवढेच जबाबदार आहेत. बेशिस्त वाहतुकीला आला बसावा यासाठी औरंगाबाद वाहतूक शाखेच्या वतीने शहरातील बेशिस्त वाहनधारकांवर वाहतुकीचे नियम मोडल्यावर दंड आकारून कारवाई करत असतात. मागील दीड वर्षांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून लॉकडाऊन लागू केले आहे. या लाकडाऊनच्या काळात देखील औरंगाबाद शहरात बेशिस्त वाहन चालवणाऱ्या वाहनधारकांवर वाहतूक शाखेने कारवाई करत जानेवारी २०२० पासून जुलै २०२१ पर्यंत एकूण ५ लाख १८ हजार ५२९ प्रकरणात तब्बल १९ कोटी ३२ लाख ६ हजार ९५० रुपयांचा दंड वसूल केला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर दंड भरून देखील औरंगाबादकर मात्र बेशिस्त वाहने चालवत आहेत ही मात्र खेदजनक गोष्ट आहे.

आशिया खंडात सर्वात झपाट्याने वाढलेले शहर म्हणून औरंगाबाद शहराची ओळख आहे. शहर झपाट्याने वाढल्यामुळे साहजिकच शहरातील वाहतूक देखील मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होण्याच्या घटना शहरात अनेक महत्वाच्या रस्त्यांवर, चौकात दरदिवशी घडतच असतात. याला वाहतुकीचे कुठलेही नियम न पाळता बिनधास्तपणे वाहन चालवणारे देखील याला हातभार लावत आहेत. या बेशिस्त वाहतुकीला आला घालण्यासाठी औरंगाबाद वाहतूक शाखेच्या वतीने त्यांच्या हद्दीत अनेक बेशिस्त वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. याच अनुषंगाने २०२० या वर्षात औरंगाबाद वाहतूक शाखेने तब्बल ३ लाख ३ हजार १९८ प्रकरणांमध्ये तब्बल १० कोटी ७५ लाख ८४ हजार १०० रुपये दंडाच्या स्वरूपात वसूल केले आहे. तोच जानेवारी २०२१ ते जुलै २०२१ पर्यंत सात महिन्यात तब्बल २ लाख १५ हजार ३३१ प्रकरणांमध्ये तब्बल ८ कोटी ५६ लाख २२ हजार ८५० रुपये वसूल केले आहेत. असे एकूण जानेवारी २०२० पासून ते जुलै २०२१ पर्यंत ५ लाख १८ हजार चलनांमध्ये तब्बल १९ कोटी ३२ लाख ६ हजार ९५० रुपयांची भर शासनाच्या तिजोरीत औरंगाबादच्या सुशिक्षित नागरिकांनी बेशिस्त वाहने चालवून भरले आहेत.इतक्या मोठ्या प्रमाणात दंड भरून देखील औरंगाबादकर बेशिस्त चालवत आहेत. परिणामी औरंगाबाद वाहतूक पोलिसांची डोकेदुखी वाढत चालली आहे. याविषयी वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्तांनी सांगितले कि, शहरातील नागरिकांनी वाहन चालवताना नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. जर नागरिकांनी स्वतःहून नियमांचे पालन केले तर आम्हला कारवाई कर्णाचे काही काम नाही. परिणामी शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत होईल. तसेच वाहतुकीचे नियम मोडल्यास त्यावर कारवाई आम्ही करतच आहोत आणि पुढेही करत राहणार असेही त्यांनी सांगितले.

• वाहतूक शाखेत कर्मचाऱ्यांची कमतरता –
औरंगाबाद शहराची लोकसंख्या साधारण १५ लाखाच्या आसपास आहे. शहरात वाहने देखील मोठ्या प्रमाणात आहेत. या लाखो वाहनांना शिस्त लावण्यासाठी शहरात ५२ सिग्नल आहेत. परंतु यातील बहुतांश सिग्नल बंद अवस्थेत असल्यामुळे त्याठिकाणी वाहतूक पोलिसांना वाहतूक सुरळीत करावी ;लागत आहे. यासाठी वाहतूक पोलिसानांचा मोठा ताफा असणे आवश्यक आहे. परंतु १६ लाख औरंगाबाद करांची वाहतूक सुरळीत करण्यासाठी केवळ ३०० पोलीस कर्मचारी सध्या औरंगाबाद वाहतूक शाखेत कार्यरत आहेत. शहराची वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी किमान ६०० वाहतूक पोलिसांची गरज आहे. परंतु सध्या आपल्या शहरातील वाहतूक सुरळीत करण्याची मदार केवळ ३०० कर्मचाऱ्यांवर आहे. यामुळेदेखील कुठेतरी बेशिस्त वाहन चालवणाऱ्यांना वाव मिळत असल्याचे दिसत आहे.

Leave a Comment