डॉ. अभय बंग यांच्या मातोश्री सुमनताई बंग यांचे निधन

वर्धा : हॅलो महाराष्ट्र – ज्येष्ठ गांधी विचारक, चेतना विकासाच्या अग्रणी व स्त्री सक्षमी करणाच्या कृतीशील मार्गदर्शक श्रीमती सुमनताई बंग यांचे वयाच्या ९६व्या वर्षी सोमवार दुपारी सेवाग्राम रुग्णालयात निधन झाले. महात्मा गांधी यांचे अनुयायी व अर्थतज्ज्ञ दिवंगत ठाकूरदास बंग यांची सहचारिणी आणि समाजसेवी अशोक बंग व डाॅ. अभय बंग यांच्या मातोश्री म्हणून त्या सगळ्यांना परिचित असल्या तरी स्वतःच्या कर्तृत्वाने त्यांनी वेगळा ठसा उमटवला आहे.

सुमनताई बंग यांनी वर्धा जिल्ह्यातील परितक्त्या व विधवा स्त्रियांना सोबत घेऊन मोठ्या प्रमाणात बचत गटांचे जाळे निर्माण केले होते. त्यांनी स्त्रियांच्या आत्मसन्मानासाठी कार्य करताना शाश्वत शेती, खादी व शिक्षण प्रणालीत प्रयोगशीलता, निसर्गोपचार, कांचनमुक्ती, सामूहिक जीवन, युवक-युवतींसाठी लैंगिक शिक्षण, व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा, पती-पत्नी संमेलन, सासू-सून संमेलन असे अनेक अभिनव उपक्रम निस्वार्थपणे राबिवले.

सुमनताई बंग यांच्याविषयी
सुमनताई बंग यांचा जन्म १९२५ मध्ये अत्यंत हलाखीची परिस्थिती असलेल्या कुटुंबात झाला. सुमनताईंनी विद्यार्थीदशेत सेवादलाच्या माध्यमातून स्वातंत्र्यलढ्यात महत्वाचे योगदान दिले होते. तसेच त्या स्वातंत्र्योत्तर काळात आचार्य विनोबांच्या भूदान, ग्रामदान आणि ग्रामस्वराज्य आंदोलनात सहभागी होत्या. त्यानंतर त्यांनी जयप्रकाश नारायण यांच्या समग्र क्रांती आंदोलनात सहभाग घेऊन स्त्रियांचे नेतृत्व केले होते. सुमनताई बंग यांच्या जगण्यात अत्यंत साधेपणा होता. सुमनताई बंग यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. स्वातंत्र्य सेनानी व गांधीवादी ठाकुरदास व सुमनताई बंग यांना अशोक आणि अभय बंग ही दोन मुले आहेत. हि दोन्ही मुले गांधी विचाराने प्रेरित आहे. सुमनताई बंग यांच्या पाठीमागे नातलगांसोबतच सामाजिक कार्यातून जुळलेला मोठा परिवार आहे तो आता पोरका झाला आहे.

You might also like